no images were found
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त के.एम.सी. कॉलेजमध्ये विशेष व्याख्यान.
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि यशवंतराव चव्हाण (के. एम. सी.) कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026’ निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘महात्मा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म आणि समकालीन प्रस्तुतता’ या विषयावर ज्येष्ठ व्याख्याते डॉ. अरुण शिंदे, कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवाडे आणि मराठी विश्वकोशाचे संपादकीय सहायक सागर कांबळे उपस्थित होते. या समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. प्रशांत नागावकर होते.
डॉ. शिंदे आपल्या व्याख्यानात महात्मा फुले यांच्या सामाजिक व वैचारिक कार्याचा आढावा घेताना म्हणाले की, ‘‘महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा केवळ धार्मिक विचार नसून समता, मानवता, विवेक, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यावर आधारलेली जीवनदृष्टी आहे. फुले यांनी समाजातील विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि शोषण यांना मूलभूत आव्हान दिले.स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाचा अधिकार, श्रमाला प्रतिष्ठा आणि वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. सत्याचा स्वीकार, विवेकाची कास आणि माणसाला माणूस म्हणून सन्मान देणे हा सार्वजनिक सत्यधर्माचा केंद्रबिंदू आहे.’’
आजच्या बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीच्या संदर्भात सार्वजनिक सत्यधर्माची प्रस्तुतता अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, ‘‘आधुनिक समाजाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ठी प्रगती केली असली तरी सामाजिक विषमता, जातीय भेदभाव, स्त्री-पुरुष असमानता, अंधश्रद्धा आणि सामाजिक द्वेष यांसारखी आव्हाने अद्याप कायम आहेत. अशा परिस्थितीत महात्मा फुले यांचा सत्य, समता आणि विवेकाचा विचार अधिक व्यापकपणे समाजात रुजविण्याची गरज आहे.’’
ते पुढे असेही म्हणाले की, ‘‘अभिजात मराठी भाषेचा गाैरव हा केवळ भाषिक अभिमानापुरता मर्यादित न राहता मराठीतील समृद्ध वैचारिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याशी जाेडला पाहिजे. महात्मा फुले यांच्या लेखनातून सामाजिक परिवर्तनाची भूमिका प्रभावीपणे व्यक्त झाली असून त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यास आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे.’’
कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या विचारांचा वर्तमान सामाजिक संदर्भात चिकित्सकपणे विचार करण्यात आला. विशेषतः शिक्षण, सामाजिक समता, स्त्री-मुक्ती, विवेकवाद आणि मानवतावादी मूल्ये या विषयांवर डॉ. शिंदे यांनी सविस्तर विवेचन केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या समृद्ध वैचारिक परंपरेची तसेच महात्मा फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांची ओळख होण्यास मदत झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचा अभिजात वारसा आणि महात्मा फुले यांची समतावादी, विवेकनिष्ठ विचारपरंपरा यांचा समकालीन संदर्भात जागर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. एस.पी. कांबळे यांनी केले. याप्रसंगी महानगरपालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवाडे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय सहायक सागर कांबळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. वनिता शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. साजिद शेख यांनी आभार मानले. प्रा. डॉ. छाया माळी यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, भाषा व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.