Home Uncategorized कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर भर

कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर भर

1 min read
0
0
6

no images were found

कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर भर : विकास योजनेच्या अनुषंगाने भागधारकांची बैठक संपन्न :  ऐतिहासिक वारसा संवर्धन, रस्ते रुंदीकरण, पार्किंग, पर्यटन सुविधांवर चर्चा

कोल्हापूर,  : कोल्हापूर शहराच्या सुनियोजित, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महानगरपालिकेची विकास योजना (तिसरी सुधारित) तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, या योजनेच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, व्यावसायिक संघटना आणि संबंधित भागधारकांची बैठक आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

            या बैठकीत शहराच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन करताना आवश्यक पायाभूत सुविधा, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि विकास नियंत्रण नियमावली यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

            शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन, दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक आरक्षण व सुविधांची तरतूद, रस्ते रुंदीकरण, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता या विषयांवर उपस्थितांनी सूचना मांडल्या.

            कोल्हापूर शहराला उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक पर्यटन सुविधा, पार्किंग व्यवस्था, यात्री निवास, सार्वजनिक सोयी-सुविधा तसेच स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

            या बैठकीस विकास योजना विशेष घटकाचे उपसंचालक, तांत्रिक अधिकारी, महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, बिल्डर्स, क्रेडाई, चेंबर ऑफ कॉमर्स, विविध व्यावसायिक संघटना, सामाजिक संस्था, दिव्यांग व्यक्तींच्या संघटना, ऐतिहासिक स्थळे संवर्धन समिती, पर्यावरणवादी आणि पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

            उपस्थित भागधारकांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव व तज्ज्ञतेच्या आधारे विविध सूचना, मते आणि अपेक्षा मांडल्या. विकास योजना तयार करताना शहरातील सर्व घटकांच्या गरजा विचारात घेऊन संतुलित, पर्यावरणपूरक आणि नागरिककेंद्रित विकास साधण्यावर भर देण्यात आला.

            यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी विकास योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत सर्व भागधारकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. या बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना व अभिप्रायांचा विकास योजना तयार करताना योग्य तो विचार करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

            कोल्हापूर शहराचा भविष्यातील विस्तार, वाढती लोकसंख्या आणि बदलत्या गरजा लक्षात घेऊन पुढील २० वर्षांसाठी विकासाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

            यावेळी उप-संचालक सारिका बोधनकर, सहा.संचालक नगररचना प्रशांत भोसले, नगररचनाकार संदेश कुळवमोडे, क्रिडाईचे पदाधिकारी, आर्किटेक्चरचे पदाधिकारी, बांधकाम व्यवसायीक, हेरीटेज कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिरोली पोलिसांच्या निषेधार्थ माधुरी जाधव उद्या उपोषणाला बसणार : पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा; तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप

शिरोली पोलिसांच्या निषेधार्थ माधुरी जाधव उद्या उपोषणाला बसणार : पोलीस अधीक्षक कार्यालयासमो…