Home Uncategorized भारताला महासत्ता बनविण्यासाठी नवोन्मेषी युवकांची गरज: जनरल जे. जे. सिंग

भारताला महासत्ता बनविण्यासाठी नवोन्मेषी युवकांची गरज: जनरल जे. जे. सिंग

5 second read
0
0
11

no images were found

भारताला महासत्ता बनविण्यासाठी नवोन्मेषी युवकांची गरज: जनरल जे. जे. सिंग

कोल्हापूर, : भारताला महासत्ता बनविण्यासाठी केवळ पदवीधर युवकांची नव्हे, तर आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीला दिशा देणाऱ्या नवोन्मेषी (इनोव्हेटर) युवा पिढीची नितांत गरज आहे. युवकांनी पारंपरिक वाटेने जाण्याऐवजी स्वतःची वेगळी वाट निर्माण करावी, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि आपल्या कल्पकतेतून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळ द्यावे. भारताला महासत्ता बनविण्याची जबाबदारी आता युवा पिढीच्या खांद्यावर असून, त्यासाठी त्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन भारताचे माजी लष्करप्रमुख आणि अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल जे. जे. सिंग यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षातर्फे ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि युवकांची भूमिका’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीतील भारतापुढील सुरक्षा आव्हाने, आधुनिक युद्धतंत्रज्ञान, युवकांचे योगदान, नेतृत्वगुण आणि भारतीय सैन्यदलांमधील करिअरच्या संधी यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे प्रमुख उपस्थित होते.

जनरल सिंग म्हणाले, आधुनिक युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. आता युद्ध केवळ जमीन, आकाश आणि समुद्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. अवकाश, सायबर आणि माहिती-मानसिक क्षेत्र (कॉग्निशन) ही युद्धाची नवी क्षेत्रे बनली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भविष्यातील सुरक्षेची जबाबदारी केवळ सैन्यदलांची राहणार नसून उद्योग, संशोधन संस्था, तंत्रज्ञान क्षेत्र, परराष्ट्र सेवा आणि समाजातील विविध घटकांचेही योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. भारताने आत्मनिर्भरता, संशोधन, तंत्रज्ञानातील प्रगती आणि विविध क्षेत्रांतील समन्वयाच्या माध्यमातून स्वतःची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.

युवकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची पंचसूत्री

भारतीय युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आत्मसात कराव्यात, असे सांगताना जनरल सिंग यांनी पाच सूत्रे मांडली. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान आणि ड्रोन तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक क्षेत्रांचे ज्ञान मिळविणे; संशोधन व नवनिर्मितीला प्राधान्य देऊन स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात आणणे; आपल्या निवडलेल्या व्यवसायक्षेत्रातील जागतिक घडामोडी आणि तंत्रज्ञानातील अद्ययावत बदलांची माहिती ठेवणे; किमान एका परकीय भाषेचे ज्ञान संपादन करून जागतिक स्तरावरील संधींसाठी स्वतःला सक्षम बनविणे; तसेच पारंपरिक विचारसरणीच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र विचार, पुढाकार आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करणे, या बाबींचा समावेश आहे. युवकांनी आपली बुद्धिमत्ता केवळ पदवी मिळविण्यासाठी न वापरता देशाच्या तांत्रिक सामर्थ्यात भर घालण्यासाठी वापरावी. संशोधन आणि तंत्रज्ञानातील नवनवीन शोध हेच भारताचे तांत्रिक सुरक्षा कवच अधिक मजबूत करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय सैन्यदलांमध्ये करिअरच्या विविध संधी

भारतीय सैन्यदलांमध्ये युवक-युवतींसाठी अनेक प्रकारच्या करिअर संधी उपलब्ध असल्याचे सांगून जनरल सिंग यांनी त्यांची माहिती दिली. बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) माध्यमातून, तर पदवीनंतर संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेद्वारे (सीडीएस) सैन्यदलात प्रवेश करता येतो. अग्निपथ योजनेतूनही सैन्यदलांमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध आहे. अभियांत्रिकी पदवीधरांसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलांमध्ये तांत्रिक प्रवेशाचे पर्याय आहेत. तसेच डॉक्टर, अभियंते आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या संधी उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज आणि आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या माध्यमातून सैन्यदलात सेवा करता येते. महिलांसाठीही लष्कर, नौदल आणि हवाई दलांमध्ये विविध लढाऊ तसेच सहाय्यक जबाबदाऱ्यांची दारे खुली झाली आहेत. हवाई दलात महिला वैमानिकांनाही संधी मिळत आहे. त्यामुळे युवक-युवतींनी सैन्यदलातील संधींची माहिती घेऊन देशसेवेचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे, तर विश्वास आणि आदर संपादन करण्याची क्षमता

नेतृत्वगुणांविषयी बोलताना जनरल सिंग म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्पष्ट ध्येय, कठोर परिश्रम, निर्णयक्षमता आणि पुढाकार आवश्यक आहे. नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजविणे नव्हे, तर स्वतःच्या कृतीतून इतरांचा विश्वास आणि आदर संपादन करणे होय. योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी परिस्थितीचा सखोल विचार, ज्ञान आणि अनुभव आवश्यक असतो. चुका झाल्यास त्यातून शिकावे; मात्र कोणत्याही व्यक्तीच्या क्षमतेविषयी घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत. काम पुढे ढकलण्याची सवय सोडून आजचे काम आजच पूर्ण करण्याची वृत्ती अंगी बाणवावी. प्रत्येकाने आपल्या कामात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करावा. नेतृत्व करताना स्वतः उदाहरण घालून द्यावे आणि सहकाऱ्यांच्या क्षमतांचा विकास होईल याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

भारताच्या सामर्थ्याचा उल्लेख करताना त्यांनी लोकशाही व्यवस्था, सक्षम अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक दृष्टिकोन असलेली सैन्यदले ही देशाची प्रमुख शक्तिस्थाने असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळातील तंत्रज्ञान, युद्धनीती आणि भौगोलिक परिस्थितीचा प्रभावी उपयोग करून बलाढ्य शत्रूंवर मात केली. त्याच प्रेरणेतून आजच्या युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला जागतिक स्तरावर सामर्थ्यशाली बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे सांगितले. युवकांनी मोठी स्वप्ने पाहावीत, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे. आगामी काळात भारताला महासत्ता बनविण्याची जबाबदारी युवा पिढीने समर्थपणे पेलावी, असे आवाहन करून त्यांनी समारोप केला.

आदर मागून मिळत नाही, तो कर्तृत्वातून संपादन करा!

जनरल जे. जे. सिंग यांनी युवकांना पुढीलप्रमाणे संदेश दिले:-

आदर मिळविण्याची पात्रता विकसित करा : अधिकाराच्या जोरावर नव्हे, तर आपल्या कृतीतून इतरांचा विश्वास आणि आदर संपादन करा.

रोज विचार करा : आपल्या अभ्यासाच्या किंवा कामाच्या टेबलावर ‘THINK’ हा शब्द लिहून ठेवा. दिवसातून काहीतरी नवीन विचार, कल्पना किंवा संकल्पना सुचली पाहिजे.

योग्य निर्णयक्षमता विकसित करा : परिस्थितीचे आकलन, ज्ञान आणि दूरदृष्टी यांच्या आधारे योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवा.

वेळेचे महत्त्व ओळखा : उद्याचे काम आज आणि आजचे काम आत्ताच करण्याची सवय लावा.

स्वतःची वेगळी वाट निर्माण करा : मेंढरांच्या कळपाप्रमाणे अनुकरण न करता स्वतंत्र विचार करा, नावीन्याचा ध्यास घ्या आणि ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा.

देशाची संरक्षण क्षेत्रातील झेप वेगवान: कुलगुरू डॉ. कामत

कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी अध्यक्षीय मनोगतात भारताच्या संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेताना, देशाची संरक्षण उत्पादनक्षमता आणि उद्योजकता झपाट्याने विस्तारत असल्याचे नमूद केले. २०१३-१४ च्या तुलनेत भारताचे संरक्षण उत्पादन जवळपास चौपट वाढून गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी १ लाख ७८ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच भारत ८० हून अधिक देशांना ३८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची संरक्षण सामग्री निर्यात करीत असून, २०२९ पर्यंत वार्षिक ५० हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देतानाच जागतिक संरक्षण बाजारपेठेतही भारत आपले स्थान भक्कम करीत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील उद्योजकता, संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप्ससाठी मोठ्या संधी निर्माण होत असून, कोल्हापूरमधील फाउंड्री आणि अभियांत्रिकी उद्योगही भारतीय संरक्षण क्षेत्राचे महत्त्वाचे पुरवठादार बनले आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रातील करिअर केवळ सैन्यदलांपुरते मर्यादित नसून विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, व्यवस्थापन, वाणिज्य, कायदा आणि पत्रकारिता अशा विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठीही या क्षेत्रात व्यापक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सिद्धार्थ शिंदे यांनी जवान आणि सोल्जर यापलिकडेही भारतीय सैन्यदलात अनेक प्रकारच्या संधी असून त्यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, हा हेतू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व परिचय मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी केले. शामल पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषदेसह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर भर

कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावर भर : …