
no images were found
मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी
पालघर : इमारतीच्या गच्चीवर बोलताना हातातून निसटून टेरेसच्या सज्जावर पडलेला मोबाईल काढायला गेलेली मुलगी इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. सुदैवाने यात या मुलीचे प्राण वाचले असून गंभीर जखमी झाली आहे. अग्निशमन दलाने या मुलीची सुखरूप सुटका केली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नालासोपारा रजनी अपार्टमेंटमध्ये राहणारी श्रुती पांडे ही १९ वर्षाची मुलगी रविवारी संध्याकाळी सहा वाजता इमारतीच्या टेरेसवर गेली होती. मोबाईलवर बोलत असताना तिचा मोबाईल हातातून निसटला आणि टेरेसच्या सज्जावर पडला. मोबाईल काढायला श्रुती खाली वाकली मात्र तोल गेल्यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी ग्रीलवर पडली. अडगळीची जागा असल्याने या ठिकाणाहून बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने श्रुती या ठिकाणी अडकून पडली.
तिने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर इमारतीतील रहिवाशांचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यानंतर इमारतीमधील इतर रहिवाशांनी अग्निशमन विभागाला फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आचोळे येथील अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मुलगी टेरेसच्या पत्रावर अडकली होती त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी दुसऱ्या मजल्याच्या घराच्या खिडकीची ग्रील कापून पत्र्यावर गेले आणि या मुलीची सुटका केली. गच्चीवरून खाली पडल्याने मुलीच्या हाताला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.