
no images were found
तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
पालघर: प्रेम प्रकरणातून गोळी झाडून तरुणीची हत्या करून तरुणानं स्वत: आत्महत्या केल्याची घटना बोईसरमध्ये घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तरुणाने संरक्षण दलाच्या वाहनाखाली उडी घेवून आत्महत्या केली.
बोईसर परिसरातील टिमा रुग्णालयासमोर तरुणाने बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तरुणीवर गावठी पिस्तुलाने गोळीबार केला. या गोळीबारात नेहा दिनेश महतोचा मृत्यू झाला. दरम्यान गोळीबाराची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कृष्णा सत्यदेव यादवने नेहा महतोचा पाठलाग करत रस्त्यावरच तिच्यावर गोळीबार केला. त्यामुळे या तरुणीचा जागीच मूत्यू झाला. त्या नंतर घटनास्थळापासून चालत जाऊन सुमारे ५०० मीटर अंतरावर डी-डेकॉर कंपनीसमोर आरोपीने संरक्षण दलाच्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
जखमी झालेल्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गोळीबारासाठी वापरण्यात आलेले गावठी पिस्तुल जप्त केले आहे. बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.