no images were found
शिरोली पोलिसांच्या निषेधार्थ माधुरी जाधव उद्या उपोषणाला बसणार : पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा; तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप
कोल्हापूर : फसवणूक, सोशल मीडियावरील छेडछाड आणि कौटुंबिक त्रासासंदर्भात वारंवार तक्रार अर्ज देऊनही शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत माधुरी राजू जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या कथित निष्क्रियतेच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही वारंवार लेखी तक्रारी आणि पाठपुरावा करण्यात आला. मात्र, तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
शरद पोवार, संतोष शिंदे, बाबासो मडके, मंगेश जाधव, अनिल पोवार यांच्यासह अन्य संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांनी संगनमताने आपले जावई अवधूत अशोक सोरटे यांना गैरमार्गाला लावून आर्थिक फसवणूक केल्याचा, तसेच मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. याशिवाय शेतातील विद्युत मोटार चोरीला गेल्याच्या प्रकरणातही संशयितांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला.
या सर्व तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माधुरी जाधव यांनी केली आहे. तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आता या उपोषणानंतर तरी पोलीस प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.