no images were found
स्व. उदय कुलकर्णी यांच्या पत्रकारितेवर शुक्रवारी विद्यापीठात विशेष व्याख्यान
कोल्हापूर,( प्रतिनिधी ): येथील ज्येष्ठ पत्रकार स्व. उदय कुलकर्णी यांच्या पत्रकारितेचा वेध घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ज्येष्ठ संपादक वासुदेव कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होणार आहे.
स्व. उदय कुलकर्णी यांनी चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत योगदान दिले. या काळात त्यांनी विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य, संस्कृती, देवदासी प्रथा आणि अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास करून लेखन केले. विविध सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटविला. अलीकडेच त्यांचे निधन झाले. स्व. उदय कुलकर्णी यांच्या पत्रकारितेचा प्रवास, त्यांचे लेखन आणि पत्रकारितेतील योगदान यांची माहिती विद्यार्थ्यांना व नव्या पिढीतील पत्रकारांना व्हावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, विद्यार्थी आणि पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.