no images were found
‘खेत बचाओ अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी मार्गदर्शन सत्रे : नैसर्गिक शेती, मृदासंवर्धन, खत व्यवस्थापन आणि डिजिटल फार्मर आयडीबाबत जनजागृती
कोल्हापूर : केंद्र सरकारच्यावतीने २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘खेत बचाओ अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आत्मा कोल्हापूर, कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे व कणेरीमठ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
वसगडे येथे मृदासंवर्धन व नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन
करवीर तालुक्यातील मौजे वसगडे येथे मृदासंवर्धन व नैसर्गिक शेती गटातील शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत ‘एल निनो’चे संभाव्य दुष्परिणाम, शेतीतील पाण्याचे योग्य नियोजन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून रासायनिक खतांचा कमीत कमी वापर तसेच सेंद्रिय भाजीपाला विक्री व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुरस्कारप्राप्त शेतकरी, शेतकरी गटांचे अध्यक्ष आणि कृषी सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतही उपक्रम
शाहूवाडी तालुक्यातील लोळणे, परखंदे, शिरूर तर्फ मलकापूर, पुसाळे, भेंडवडे व लोलगे तसेच पन्हाळा तालुक्यातील पोकले येथेही ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर माहिती दिली.
आत्मा व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी माती परीक्षण, संतुलित खतवापर आणि खत व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे उपाय आणि ‘ॲग्रीस्टॅक’अंतर्गत डिजिटल फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया व त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच दुष्काळी परिस्थितीत चारा व्यवस्थापन आणि जनावरांचे आरोग्य जपण्याबाबतही माहिती देण्यात आली.
या अभियानाच्या माध्यमातून हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.