
no images were found
गणेश विसर्जनासाठी गेलेल्यांवर मधमाशांचा हल्ला; ४२ जखमी
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथे गौरी गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांमध्ये मधमाशांचा हल्ला झाला. यामध्ये तब्बल ४२ जण जखमी झाले आहेत. ही घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली असून यामध्ये जखमी झालेल्या सर्व गणेश भक्तांना बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले. त्यांपैकी ३८ जणांना आता घरी सोडण्यात आले आहे.
शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तांवर मधमाश्यांच्या हल्ला झाला असून या हल्ल्यात ४२ जण जखमी झाले आहेत. गावात असलेल्या तलाव परिसरात गणेश विसर्जन सुरू होते. यावेळी सायंकाळी पाचच्या सुमारास काही गणेश भक्तांनी येथे फटाक्याची माळ लावली यावेळी फटाक्यांमधून उडालेली पुंगळी मधमाशांच्या पोळ्यात घुसल्याने बिथरलेल्या मधमाश्यांनी गावतलावावरील नागरिकांच्या जमावावर हल्ला केला.
यामुळे घाबरलेल्या नागरिक पळापळी करू लागले. दरम्यान येथील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे तसेच स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारांसाठी बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रात तातडीने दाखल केले. तर पोलिसांना माहिती मिळताच येथील पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.