
no images were found
कोल्हापुरात फक्त राजर्षी शाहूंचा विचार चालतो, ३ लाख गणेश मूर्तीचं दान
कोल्हापूर : जिल्ह्यात काल ५ दिवसाच्या गणपती बाप्पाला अतिशय भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. एक विशेष बाब म्हणजे या वर्षीच्या विसर्जनात कोल्हापूरकरांची एकता आणि शाहू महाराजांची शिकवण दिसून आली. यावर्षी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पंचगंगा खळखळाट करत हसत होती तर कोल्हापूरकर नागरिक अख्ख्या महाराष्ट्राला एक नवीन शिकवण घालत होते.
नागरिक प्रशासन एकत्र आल्यास काय होऊ शकते? याचं एक उत्तम उदाहरण काल झालेल्या गणपती विसर्जनावेळी पाहायला मिळाले. एका लोकप्रतिनिधींचा हट्ट झुगारून आपलं शहर हे आणखी सुंदर करण्यासाठी नागरिकांनी २ वर्षापूर्वी सुरू केलेलं पर्यावरण पूरक गणेश विसर्जन यंदाच्या वर्षीही सुरुच ठेवलं. जिल्ह्यात २ लाखांहून अधिक मूर्तींचं पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन पार पडलं.
यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याचं मुखमंत्र्यानी जाहीर केलं. लगोलग इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी यंदाचं गणेश विसर्जन पंचगंगेत होणार असून यासाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचं घाईघाईत सांगितलं. आवाडे यांच्या भूमिकेला विरोध सुरू झाला. गेल्या २ वर्षापासून पंचगंगा प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल करत असताना पुन्हा मतांच्या राजकारणासाठी हा निर्णय योग्य नाही असा सूर उमटू लागला.
तथापि, प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे आदेश दाखवत प्लास्टर ऑफ पॅरिसचे आणि त्यावरील केमिकल युक्त रंगाचे दुष्परिणाम सांगत गणेश मुर्तीचं पंचगंगा नदीत विसर्जन करण्यास बंदी घातली. यामुळे एक लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा सामना रंगला. अतिशय आक्रमकरित्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे निर्णय घेतले.