no images were found
मैत्री’च्या कथानकाचा काळ सहा वर्षांनी पुढे नेणार!
‘झी टीव्ही’ वाहिनीने अलीकडेच ‘मैत्री’ ही नवी मालिका प्रसारित करण्यास प्रारंभ केला आहे. मालिकेत मैत्री (श्रेणू पारिख) आणि नंदिनी (भाविका चौधरी) या दोन अगदी जीवश्चकंठश्च मैत्रिणींची कथा सादर करण्यात आली आहे. मैत्री आणि नंदिनी या दोघी बालपणापासूनच एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी असतात. आपली मैत्री कोणी कधीच तोडू शकणार नाही आणि आपण लग्नानंतरही एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी राहू, याची या दोघींना पक्की खात्री असते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते.
प्रसारणास प्रारंभ झाल्यापासून या मालिकेने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याशी खिळवून ठेवले आहे. आता मालिकेच्या आगामी भागांमध्ये कथानकाचा काळ सहा वर्षांनी पुढे नेण्यात येणार असल्याने मालिकेच्या कथानकाला मोठी कलाटणी मिळणार आहे. काळ पुढे नेल्यानंतर आशीष (नमिष तनेजा) आणि नंदिनीचा मुलगी नंदिश याला मैत्रीचा खूप लळा लागल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नंदिनी ही आपली जन्मदात्री आहे, हे नंदिशला ठाऊक असते. पण बालपणापासूनच मैत्रीने आपल्याला वाढविले असल्याने तो तिलाच आपली आई मानत असतो. या सहा वर्षांत नंदिनी कोमातच असते. मैत्रीने या सहा वर्षांत केवळ नंदिशला वाढवण्याकडे लक्ष पुरविले आहे. एक दिवस नंदिनी कोमातून बाहेर येईल, अशी तिला आशा वाटत असते. पण नंदिनी कोमातून बाहेर आली आणि तिवारी सदनमध्ये आली, तर काय घडेल? मैत्री, आशीष आणि नंदिशच्या जीवनात तिचा पुन्हा होणारा प्रवेश त्यांच्या नातेसंबंधांमध्ये बदल घडवील का? इतक्या वर्षांनंतर मैत्री आणि नंदिनी यांच्यातील मैत्रीचे पुढे काय होईल, याचे उत्तर काळच देईल.
कथानकाचा काळ पुढे नेण्याच्या निर्णयावर श्रेणू पारिख म्हणाली, “मालिकेच्या कथानकाचा काळ सहा वर्षांनी पुढे नेल्यावर कथानकाला जबरदस्त कलाटणी मिळेल आणि त्यामुळे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होईल, यात शंकाच नाही. आता आम्ही पुन्हा एकदा भाविकाबरोबर चित्रीकरण सुरू केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.
नमिष तनेजा म्हणाला, “आमची मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहून मला मनापासून आनंद झाला आहे आणि आता कथानक सहा वर्षांनी पुढे नेल्यावर प्रेक्षकांमध्ये नवी उत्कंठा निर्माण होईल. सहा वर्षांनंतरच्या काळात प्रेक्षकांना माझ्या लूकमध्ये किरकोळ बदल झाल्याचं दिसेल.
भाविका चौधरी म्हणाली, “काळ पुढे नेल्यानंतर प्रेक्षकांना नंदिनी पूर्णपणे नव्या अवतारात पाहायला मिळेल. तिवारी कुटुंबात ती परतल्यावर सर्वांच्या आयुष्यांना मोठी कलाटणी मिळेल. त्यावर कडी म्हणजे, मी एका लहान मुलाबरोबर चित्रीकरण करणार आहे. ती गोष्ट माझ्यासाठी आव्हानात्मक तशीच उत्कंठापूर्णही असेल.
कथानकाचा काळ सहा वर्षांनी पुढे नेण्याच्या निर्णयावर श्रेणू, भाविका आणि नमिष खुश असले, तरी नंदिनीने आपल्या मुलाची मागणी केल्यावर मैत्रीचे काय होईल? मैत्री आणि नंदिनीच्या मैत्रीच्या नात्यात हे माय-लेकाचे नवे नाते अडसर निर्माण करील का?