no images were found
शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र :’राज्यशास्त्रातील नवीन प्रवाह’ यावर होणार विचार मंथन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील राज्यशास्त्र विभाग, नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेच्या ३१ व्या अधिवेशनाचे आणि दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन विद्यापीठ परिसरातील मानव्यशास्त्र सभागृह येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनासाठी ‘राज्यशास्त्रातील नवीन प्रवाहांचे चर्चाविश्व’ (Discourse of New Trends in Political Science) ही मुख्य संकल्पना (Main Theme) निश्चित करण्यात आली आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मा. प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून, सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील असतील.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध सत्रे
बदलत्या जागतिक आणि राष्ट्रीय राजकीय पटलावर राज्यशास्त्र विषयातील सिद्धांतात आणि व्यवहारात कोणते नवीन प्रवाह घडत आहेत, याचा सखोल आढावा या अधिवेशनात घेतला जाणार आहे. पहिल्या दिवशी बीजभाषण सत्रात प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे हे बीजभाषण करतील. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण चव्हाण आपले मनोगत व्यक्त करतील. सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. भारती पाटील असतील. पहिल्या सत्रात ‘भारतीय राजकीय विचारांची सद्यकालीन प्रस्तुतता’ या विषयावर प्रा. डॉ. अशोक चौसाळकर मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे असतील. दुसऱ्या सत्रात डॉ. के. के. उर्फ काशिनाथ कावळेकर स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत मा. जयदेव डोळे ‘सामाजिक चळवळ आणि राजकारण’ या विषयावर विचार मांडतील. अध्यक्षस्थानी माजी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे असतील. दुसऱ्या दिवशी चौथ्या सत्रात शोधनिबंध सादरीकरण असेल. अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील भूषवतील. पाचव्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीराम पवार ‘जागतिक व्यवस्थेतील नव प्रवाह व भारत’ या विषयावर भाष्य करतील. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शिरीषकुमार पवार असतील.
अधिवेशनाचा समारोप राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा. डॉ. रविंद्र भणगे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रा. डॉ. डी. यु. पवार, प्रा. बी. बी. पाटील, डॉ. रघुनंदन वराडकर, प्रा. डॉ. सिंकदर जमादार आणि प्रा. डॉ. बाळासाहेब भोसले उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तरी या महत्त्वपूर्ण चर्चासत्राला आणि अधिवेशनाला राज्यशास्त्र संशोधक, अभ्यासकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.