no images were found
एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
- विशाखापट्टणम (विझाग) येथे उभारल्या जाणाऱ्या ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पांना वीजपुरवठा करण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प.
- या प्रकल्पामुळे सुमारे 4,500 मेगावॅट वीजेची मागणी पूर्ण होण्यास मदत होईल.
- एईएसएलच्या पोर्टफोलिओमध्ये 1,582 सर्किट किलोमीटर (ckm) ट्रान्समिशन लाईन्स आणि 10,500 एमव्हीए (MVA) ट्रान्सफॉर्मेशन क्षमता वाढणार.
- या प्रकल्पानंतर एईएसएलच्या ट्रान्समिशन प्रकल्पांची एकूण ऑर्डर बुक 80,000 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.
अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठी खासगी ट्रान्समिशन आणि वितरण कंपनी तसेच जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत कार्यरत अदाणी समूहाचा भाग असलेल्या अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (AESL) ने आज जाहीर केले की, कंपनीला आंध्र प्रदेशातील सुमारे 8,500 कोटी रुपयांचा आंतरराज्यीय ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (विझाग) परिसरातील प्रस्तावित ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पांसाठी वीज प्रसारण व्यवस्था (पहिला टप्पा)” हा प्रकल्प भारत सरकारच्या टॅरिफ-आधारित स्पर्धात्मक निविदा (TBCB) प्रक्रियेद्वारे मंजूर करण्यात आला असून, या निविदेत एईएसएलने सर्वात स्पर्धात्मक बोली लावून हा प्रकल्प मिळवला आहे
ही ट्रान्समिशन व्यवस्था विशाखापट्टणम (विझाग) परिसरातील प्रस्तावित ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पांना वीज जोडणी आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उभारली जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे 4,500 मेगावॅट वीज मागणी पूर्ण केली जाईल. तसेच, पेंडुर्थी–विझाग परिसरात उभारल्या जात असलेल्या नवीन डेटा सेंटर्स आणि डिजिटल पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे वाढणारी वीज मागणी पूर्ण करण्यासही हा प्रकल्प मदत करेल.
हा प्रकल्प ‘विझाग पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड’ या ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (SPV) अंतर्गत राबविला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत पेंडुर्थी (विझाग) येथे 4×1500 एमव्हीए क्षमतेचे 765/400 केव्ही जीआयएस (GIS) सबस्टेशन आणि खम्मम-II येथे 3×1500 एमव्हीए क्षमतेचे 765/400 केव्ही सबस्टेशन उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे एईएसएलच्या ट्रान्समिशन नेटवर्कमध्ये 1,582 सर्किट किलोमीटर (ckm) लांबीच्या ट्रान्समिशन लाईन्स आणि 10,500 एमव्हीए ची ट्रान्सफॉर्मेशन क्षमता वाढणार आहे. यानंतर कंपनीचे एकूण ट्रान्समिशन नेटवर्क 29,531 सर्किट किलोमीटर आणि एकूण ट्रान्सफॉर्मेशन क्षमता 1,33,675 एमव्हीए इतकी होईल.
अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचे सीईओ कंदर्प पटेल म्हणाले, “विझाग ट्रान्समिशन प्रकल्प हा भारताच्या पुढील पिढीतील औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेली ऊर्जा पायाभूत व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पांच्या विकासाला चालना देईल. तसेच, पेंडुर्थी–विझाग परिसरात उभारल्या जात असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांमुळे वाढणारी वीज मागणी पूर्ण करण्यासाठी वीज व्यवस्था अधिक सक्षम करेल. भारत स्वच्छ आणि तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, शाश्वत विकासाला मोठ्या प्रमाणावर गती देणारे, मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज ट्रान्समिशन नेटवर्क उभारण्याची एईएसएलची बांधिलकी कायम आहे.”
विशाखापट्टणम (विझाग) हे शहर मोठ्या प्रमाणावर उभारल्या जाणाऱ्या एआय (AI) आणि हायपरस्केल डेटा सेंटर्स, प्रस्तावित समुद्राखालील केबल कनेक्टिव्हिटी, तसेच लॉजिस्टिक्स, स्वच्छ ऊर्जा आणि औद्योगिक पायाभूत सुविधांमुळे भारतातील महत्त्वाचे डिजिटल पायाभूत सुविधा केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. या भागात ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि डेटा सेंटर्सची संख्या वाढत असल्याने, सातत्यपूर्ण वीजपुरवठा, वीज नेटवर्कची स्थिरता आणि दीर्घकालीन औद्योगिक स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी उच्च क्षमतेची आणि विश्वासार्ह ट्रान्समिशन व्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.