no images were found
कोल्हापूर जिल्ह्यातील 19 मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू होणार
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने वर्ष 2020 मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील 19 मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितले. ते श्री विठ्ठल मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले की, कोल्हापूरप्रमाणे यापूर्वी मुंबई, ठाणे, रायगड, नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण 165 हून मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरातील 12, मलकापूर येथील 3, हुपरी येथील 3, तळंदगे येथील 1 या मंदिरासह जिल्ह्यातील 19 मंदिरांमध्ये ही वससंहिता लागू करण्यात येणार आहे.
सुनील घनवट म्हणाले, “5 फेब्रुवारी 2023 या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’मध्ये ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ 4 महिन्यांमध्ये ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. तुळजापूर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी विरोध झाला; मात्र त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात 165 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस आणि सी कैथ्रेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे.
महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पैंट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून 1 जानेवारी 2016 पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली. तसेच मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे.
श्री एकमुखी दत्त मंदिर पुजारी संतोष गोसावी पत्रकार परिषदेत म्हणाले, “भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रचार होण्यासह तिच्याविषयी पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल. तसेच पाश्चात्त्यांच्या तुलनेत पारंपारिक युवा वस्त्र निर्मिती करणाऱ्या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी. त्यामुळे आम्हीही आमच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत आहोत.’ ”
या पत्रकार परिषदेसाठी या मंदिर विश्वस्तांसह हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे, श्री विठ्ठल मंदिर व आनंद स्वामी मठाचे किशोर माने, रावणेश्वर महादेव मंदिराचे गौरीशंकर संगोळी, श्री वीरशैव ककैय्या समाज शिव मंदिराचे गणेश नारायणकर, श्री खोल खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि श्री शनैश्वर महादेव मंदिराचे मेघश्याम जगताप, श्री पंचमुखी गणेश मंदिर अजय पाटील यांसह अन्य मंदिर विश्वस्त आणि पुजारीही उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यामधील मंदिरामध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्र संहिता लागू होत असतानाच कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरामध्ये ही ती लागू करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात येणार आहे व पाठपुरावा करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघ समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.
🟠 वस्रसंहिता लागू करण्यात येणारी कोल्हापूर जिल्हयातील मंदिरे
🔅कोल्हापूर शहर
- श्री एकमुखी दत्त मंदिर
- श्री विठ्ठल मंदिर व आनंद स्वामी मठ
- श्री रावणेश्वर महादेव मंदिर
- श्री वीरशैव ककैय्या समाज शिवमंदिर
- श्री काळभैरव मंदिर
- श्री भाविक विठोबा मंदिर
- श्री पंत बाळेकुंद्री दत्त मठी
- श्री विठ्ठल मंदिर
- श्री ओंकारेश्वर मंदिर
- श्री पंचमुखी गणेश मंदिर
- श्री खोल खंडोबा मंदिर
- श्री शनैश्वर महादेव मंदिर,
🔅मलकापूर
- श्रीराम मंदिर
- श्री नरसिंह मंदिर 15. श्री जुगाई देवी मंदिर
🔅हुपरी
- श्री अंबाबाई मंदिर 17. श्री विठ्ठल मंदिर
- श्री ज्योतिबा मंदिर
🔅तळंदगे
- श्री जगन्नाथ मंदिर