
no images were found
कोल्हापूरमध्ये आज रंगणार दहीहंडीचा थरार
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीसह 8 ठिकाणांवर दहीहंडीचा जल्लोषात साजरी होईल. या पथकांवर पाच हजार ते तीन लाखांपर्यंत बक्षीसांची बरसात केली जाणार आहे. युवाशक्तीकडून रंगणाऱ्या दहीहंडीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गोविंदा पथकास 3 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महिला गोविंदा पथकासही प्रोत्साहानपर म्हणून 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
या दहीहंडीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, सुरेश हाळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित राहणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सर्वात वर असणाऱ्या गोविंदाचा सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. दहीहंडी कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी ढोल ताशा पथक, तसेच सार्थक क्रिएशनकडून सांस्कृतिक कार्यक्रम असेल. स्पर्धेत पृथ्वीराज महाडिकांकडून कपड्याचे कीट दिलं जाणार आहे.
शिवसेनेची दहीहंडी बिंदू चौकात रंगणार
दुसरीकडे कोल्हापूर शिवसेनेकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. बिंदू चौकात दुपारी 3 वाजता निष्ठा दहीहंडी रंगणार आहे. या दहीहंडी स्पर्धेत विजेत्या गोविंदा पथकाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिलं जाणार आहे. शिवसेनेकडूनही दहीहंडीवेळी रोषणाई, नृत्याविषष्कार आयोजित करण्यात आला आहे.