no images were found
एल्गार परिषद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; तीन महिन्यात आरोप निश्चित करण्याचे आदेश
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाला भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्विसवरील आरोप तीन महिन्यांत निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. एल्गार परिषद प्रकरणातील देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या कार्यकर्त्यांविरुद्धचा खटला पुढे सरकत नसून आरोपी गेल्या चार वर्षांपासून कोठडीत आहेत, याकडे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधले आहे. ट्रायल कोर्टाला एकाच वेळी आरोप निश्चित करण्यासाठी आणि खटल्यातील दोषमुक्तीची मागणी करणाऱ्या आरोपींच्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांची मुदत दिली आहे. न्यायमूर्ती यूयू ललित आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील आरोपी गोन्साल्विसच्या जामीन अर्जावर फेरविचार करताना हे निर्देश दिले. एनआयएला १५ प्रकरणांची सुनावणी वेगळी करण्यासाठी पावले उचलण्यास यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. ट्रायल कोर्टासमोर योग्य अर्ज दाखल करून उर्वरित आरोपींना अटक करा आणि इतर चार आरोपींनाही घोषित गुन्हेगार म्हणून घोषित करा, असंही यावेळी न्यायालयाने नमूद केलं आहे.