no images were found
कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेंडा पार्क येथे आयटी पार्क उभारणीसाठी ३४.३६ हेक्टर जमीन AIDC कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर लगेचच आमदार महाडिक यांनी कोल्हापुरातील आयटी पार्क साठी पाठपुरावा सुरू केला होता. यासाठी त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदने दिली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत बैठक घेत कृषी विभागाकडील जागा हस्तांतरणासाठी महाडिक आग्रही होते.
कोल्हापुरातील आयटी इंजिनिअर्सना सुविधांअभावी पुणे,बंगळुरू, हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागत होते. हे ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी आयटी पार्क गरजेचे असल्याचे महाडिक यांनी अधोरेखित केले होते.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी ३४.३६ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे कृषी विभागाची जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरित होणार आहे. शेंडा पार्क येथे होणाऱ्या आयटी पार्कमुळे कोल्हापुरातील तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होणार आहे. कोल्हापूरकरांना दिलेल्या वचनाच्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली आहे.