Home Uncategorized कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव

2 second read
0
0
19

no images were found

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव

कोल्हापूर,(प्रतिनिधी): कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातामध्येही वाचनाचे, ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित राहणार असून कोणतेही तंत्रज्ञान पुस्तकांना पर्याय ठरणार नाही, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले.

महाराष्ट्र विद्यापीठे आणि महाविद्यालयीन ग्रंथपाल (मुकला) संघटना, शिवाजी विद्यापीठ शाखा, विद्यापीठाचे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचे भवितव्य’ या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. मुकला संघटनेचे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे अध्यक्षस्थानी होते.

प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी व्यक्तीगत आयुष्यातील काही उदाहरणे देत ग्रंथालयांचे महत्त्व आपल्या भाषणात विषद केले. त्या म्हणाल्या, एक शिक्षक आणि संशोधक म्हणून आयुष्याला ग्रंथांनी खरा आकार दिला. ३६ वर्षांच्या संशोधकीय वाटचालीमध्ये ग्रंथालये आणि त्यांच्या ग्रंथपालांचे योगदान खूप मोलाचे ठरले आहे. ग्रंथालये ही ज्ञानाचे वाहक आणि प्रज्ञेचे निर्माते आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही या मूळ स्रोतांचे महत्त्व अबाधित राहणार आहे. कारण वस्तुनिष्ठ माहितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेलाही अंतिमतः ग्रंथांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. या युगात वाढलेल्या नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना ग्रंथालयांकडे आकर्षित करण्याचे आव्हान निश्चितपणे ग्रंथपालांसमोर उभे असून त्यामध्ये ते नक्की यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिषदेचे संचालक डॉ. एस.ए.एन. इनामदार म्हणाले, जग आज एका ऐतिहासिक वळणावर उभे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या परिवर्तनाचे आपण साक्षीदार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या वर्तमानावर मोठा प्रभाव टाकत आहे आणि भविष्याला आकार देण्यास सज्ज झाली आहे. ग्रंथालयांसाठी ती एक सक्षम संधी म्हणून सामोरी आली आहे. ग्रंथालयांनी नेहमीच तंत्रज्ञानातील बदल स्वीकारले आहेत. संगणकाच्या आगमनानंतर ग्रंथालयांचे ऑटोमेशन झाले. इंटरनेटमुळे ग्रंथालये डिजिटल प्रवेशद्वारे बनली. आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे स्वयंचलित कॅटलॉगिंग, मेटाडेटा निर्मिती आणि वर्गीकरण ही ग्रंथालयातील नियमित तांत्रिक कामे अधिक जलद आणि अचूक होतील. एआय-आधारित चॅटबॉट विद्यार्थ्यांना, संशोधकांना २४ तास संदर्भ आणि रेफरल सेवा देऊ शकते. मशीन लर्निंग अल्गोरिदम वर्तन आणि शैक्षणिक ट्रेंडच्या वापराचे विश्लेषण करून ग्रंथपालाला संग्रह विकासात मदत करू शकते. तथापि, तंत्रज्ञान डेटा प्रक्रिया करू शकते, परंतु मानवी बुद्धिमत्तेची, ज्ञानाची जागा घेऊ शकत नाही. भविष्यातील ग्रंथपाल केवळ पुस्तके आणि डेटाबेस व्यवस्थापित करणार नाही तर डेटा ग्रंथपाल आणि माहिती साक्षरता शिक्षक, संशोधन डेटा व्यवस्थापक, डिजिटल ज्ञान निर्माता आणि माहितीमध्ये नैतिक मार्गदर्शन करेल. आणि हे परिवर्तन साध्य करण्यासाठी, ग्रंथपालांना नवीन क्षमता आत्मसात करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोहन खेरडे म्हणाले, ग्रंथालयांचा विकास हेच उद्दिष्ट घेऊन मुकला कार्यरत आहे. ग्रंथपाल हे केवळ प्रशासक नाहीत, तर सेवा पुरवठादार असण्याबरोबर ते शिक्षक आणि संशोधकही आहेत. त्यामुळे ग्रंथालयांना नव्या युगातील संधी आणि आव्हाने यांसाठी सक्षम करण्याची जबाबदारी ते निश्चितपणे पेलतील. ग्रंथालये आणि प्रभावी आणि उपयुक्त बनविण्याच्या कामी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने ग्रंथपालांनी विचारविमर्श करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या महर्षी धोंडो केशव कर्वे ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. विलास जाधव यांना यंदाचा ‘मुकला सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरुप होते.

सुरवातीला ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि रोपास पाणी वाहून मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सचिनकुमार पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुकलाचे महासचिव डॉ. विनय पाटील यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सौ. एस.डी. हजारे आणि अमृता देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर यांनी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…