
no images were found
खर्या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था
फोंडा, (गोवा,प्रतिनिधी ):-१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात पार पडलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा देशस्तरावर स्तरावर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतना निर्माण करणारा एक अपूर्व सोहळा ठरला. या तीन दिवसीय ऐतिहासिक महोत्सवाने ‘न भूतो न भविष्यति’ असा ठसा उमटवला असून खर्या अर्थाने ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद झाला असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सांगितले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची समारोपीय पत्रकार परिषद आज पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. श्री. वर्तक पुढे म्हणाले की, गोव्याच्या इतिहासात भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक लोकांचा एवढे भव्य, नेत्रदीपक आणि नियोजनबद्धपणे झालेला एकमेव कार्यक्रम होता, असे मत अनेक विचारवंत, प्राध्यापक, उद्योजक, लेखक, संपादक, केंद्रीय मंत्री आणि प्रतिष्ठित यांनी मत व्यक्त केल्याची माहिती देतांनाच दरवर्षी अशा प्रकारच्या शंखनाद महोत्सवाचे आयोजन करावे, अशी मागणीही समाजातून येऊ लागली आहे, असेही श्री. वर्तक यांनी या वेळी सांगितले.
फोंडा येथील ‘पॅन अरोमा’ या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला माजी निवडणूक आयुक्त श्री. नारायण नावती, उद्योजक श्री. मनोज गावकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, उद्योजक श्री. जयंत मिरिंगकर, ब्राह्मण महासंघाचे श्री. राज शर्मा आणि गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी हे उपस्थित होते.
संत महात्म्यांची, व्याख्याते, लेखक आणि सनातन राष्ट्रहितेच्छुकांची मांदियाळी; विविध मार्ग आणत्र कक्ष यांना ऋषी आणि देवतांची नावे असलेल्या भव्य ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी’ची निर्मिती; ३०,००० जणांची दोन्ही वेळेची भोजनव्यवस्था, तसेच १ लक्ष लोकांना महाधन्वंतरीयागाच्या प्रसादाचे वाटप; मान्यवरांच्या भाषणांसह साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन अशा विविधांगी कार्यक्रमांच्या सह एकीकडे क्षात्रतेजसंपन्न शिवकालिन शस्त्र-प्रदर्शन, तर दुसरीकडे भक्ती आणि ब्राह्मतेजसंपन्न १५ संतांच्या पादुकांचे दर्शन; इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही सुनियोजित वाहतुक व्यवस्थेमुळे स्थानीय जनजीवन सुरळीत राखण्यात आलेले यश, अशा विविधांगी वैशिष्ट्यांनी नटलेल्या या महोत्सवाची सांगता झाली.
महोत्सवाच्या उत्तरार्धात झालेला शतचंडी यज्ञ हा विशेषतः पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारतीय सैन्याचा विजय व्हावा, यासाठी करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने सैन्यदलासाठी १ लाख ११ हजार रुपयांची रक्कम गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते ४ मान्यवरांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ पुरस्कार आणि २१ मान्यवरांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात ‘सव्यासाची गुरुकुलम’ यांच्या वतीने शिवकालीन युद्धकला, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके, तर महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने नृत्य आणि संगीत यांचे सादरीकरण करण्यात आले.
या महोत्सवासाठी हजारो जण गोव्याबाहेरून आले, त्यांनी गोव्यातील मंदिरे, ऐतिहासिक स्थळे यांना भेटी दिल्याने गोव्यातील ‘स्पिरिच्युअल टूरिझम’ ला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. देश-विदेशांतून आलेल्या मान्यवरांवर गोवा ही ‘भोगभूमी’ नसून ती ‘योगभूमी’ आहे, हे ठसवण्यात या महोत्सवामुळे मोठे यश मिळाले, असे निश्चितपणे म्हणता येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात गोवा शासन, पोलीस प्रशासन, गोवा इंजिनिअरिंग कॉलेज, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामस्थ यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले, तसेच पत्रकार, उद्योजक व सेवाभावी संस्थांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. त्याचबरोबर सर्व आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांच्या संस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग दिला, याबद्दल त्यांचे विशेष आभार !
या भव्य महोत्सवाची चर्चा देशभर पसरली असून ‘शंखनाद’ ही संकल्पना आता देशभरात राष्ट्रनिर्माणाची चेतना निर्माण करत आहे. एकूणच या महोत्सवातून ‘राष्ट्रीय एकात्मता’, ‘भारतीयत्वाची भावना’, ‘आध्यात्मिक ऊर्जा’, ‘सांस्कृतिक चेतना’ आणि ‘शौर्य’ यांचा प्रभावी जागर झाला. त्यामुळे अनेक मान्यवरांनी तसेच सामान्य नागरिकांनी ‘असा महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा’, अशी मागणी केली. ही एकप्रकारे कार्यक्रमाच्या यशस्वीतेचीच साक्ष म्हणावी लागेल.