no images were found
पोर्ट्रेट, लँडस्केप चित्रकलेविषयी शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे दोनदिवसीय चित्रकला कार्यशाळा आज उत्साहात पार पडली. कार्यशाळेचा विषय “पोर्ट्रेट, लँडस्केप अँड कॉम्पोझिशन” असा होता. दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्रसिद्ध चित्रकार प्रा. अभिजीत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेतील बारकावे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगत मार्गदर्शन केले.
संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे सभागृह आणि परिसरात कार्यशाळा झाली. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पोर्ट्रेट, लँडस्केप तसेच चित्ररचनेतील संतुलन, रंगसंगती आणि मांडणी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रकारची चित्रे साकारली. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या भिंतीवर चित्रकला पदविकेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले भित्तीचित्र पाहून उपस्थित रसिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यासोबत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात पोर्ट्रेट, निसर्गचित्रे आणि विविध संकल्पनांवर आधारित चित्रांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना उपस्थित कला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करण्यात आले.
अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बबन माने, विजय उपाध्ये यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले. कार्यशाळेसाठी प्राचार्य अजेय दळवी, डॉ. मानसिंग टाकळे, चित्रकार विजय टिपुगडे, संग्राम भालकर, सुदर्शन वंडकर, गजानन वाघमारे यांच्यासह अधिविभागातील शिक्षक, चित्रकला शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.