no images were found
आण्णासाहेब लठ्ठे महत्त्वाचे लोकशिक्षक: आनंद मेणसे
कोल्हापूर,(प्रतिनिधी): शाहूकार्याशी बांधिलकी आणि गांधीविचारांशी निष्ठा अशा मुशीतून घडलेले दिवाणबहादूर आण्णासाहेब लठ्ठे हे एक महत्त्वाचे लोकशिक्षक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्र, मराठी अधिविभाग आणि इतिहास अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेमध्ये ‘आण्णासाहेब लठ्ठे: जीवन आणि कार्य’ या विषयावर ते बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते, तर सांगलीच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुहास पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्राचार्य मेणसे यांनी आपल्या भाषणात प्रोफेसर लठ्ठे यांनी कोल्हापूरसह बेळगाव परिसरात केलेल्या विविधांगी कार्याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, लठ्ठे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक भूमिका पटलेली होती. विशेषतः कोल्हापूरमध्ये त्यांनी जैन विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वसतिगृहाच्या कृतीमुळे ते प्रभावित झाले होते. या माध्यमातून ते महाराजांच्या अधिक जवळ आले. त्यांच्या विचारकार्याशी त्यांनी अखेरपर्यंत बांधिलकी सांभाळली. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनात अस्पृश्यता निवारण, दलित आणि महिलांचे प्रश्न विषयपत्रिकेवर घेतल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतील अन्य मंडळींसह लठ्ठेही त्यांच्यासमवेत उभे राहिले. गांधींच्या श्रमप्रतिष्ठेच्या विचाराचे ते पाईक होते.
मेणसे पुढे म्हणाले, जयंती नदीवरील पूल, नगरविकास नियोजन, राजाराम महाविद्यालयांत प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांच्यासारख्या गुणवंत शिक्षकांना आणून येथील शिक्षणव्यवस्था दर्जेदार करणाऱ्या लठ्ठे यांचा कोल्हापूर घडविण्यात जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो बेळगावच्या राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासामध्येही आहे. १९३७ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बेळगाव उत्तरमधून लठ्ठे विजयी झाले आणि मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्रीही झाले. त्यावेळी त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आदर्शवत स्वरुपाचा होता. त्यात त्यांनी दारूबंदीचे सूतोवाच केले. आणि त्यापोटी बुडणारा महसूल घोड्यांच्या शर्यती आणि श्रीमंतांच्या घरभाड्यावरील कर इत्यादी मार्गांनी वसूल करण्याची योजना केली. दक्षिण कोकण शिक्षण संस्थेची स्थापना आणि वृद्धी याकामीही त्यांनी फार मोलाचे योगदान दिले. आजही संस्थेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त चालतो, याला लठ्ठे यांनी घालून दिलेला आदर्श कारणीभूत आहे.
अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, आण्णासाहेब लठ्ठे यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्रासह त्यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहीली. त्यांचे वाचन करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या कृती केल्या, त्यामागील कार्यकारणभाव आजच्या पिढीने जाणीवपूर्वक समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या विविध पैलूंविषयी संशोधन व अभ्यास करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सुहास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर सुखदेव एकल यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला डॉ. अशोक चौसाळकर, सुरेश शिपूरकर, डॉ. अनिल गवळी, डॉ. शरद गायकवाड, डॉ. रफिक सूरज, डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. सुभाष पाटील यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.