
no images were found
महाराष्ट्रात डिजिटल मीडियाला शासनाच्या जाहिराती मिळणार
मुंबई:-:-डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी राज्यभरातील पत्रकारांच्या विविध संघटना सातत्याने पाठपुरावा करत होत्या.अखेर या संघटनात्मक पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने ३ जून २०२५ रोजी एक शासन निर्णय जाहीर करून डिजिटल मीडियावरील फेसबुक,युट्युब आणि इन्स्टाग्राम या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या डिजिटल पत्रकारांना हक्काचा रोजगार देण्यासाठी शासकीय जाहिराती मिळणार आहेत.
राज्यभरातील विविध पत्रकारांच्या संघटनांनी मागणी लावून धरल्यामुळे अखेर सामान्य प्रशासन विभागाने मंगळवार दिनांक ३ जून रोजी शासन परिपत्रक क्रमांक मावज-२०२५/२५१/प्र.क्र. १३२/मावज १ द्वारे हा निर्णय घोषित केला.शासन परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, या मार्गदर्शक सूचनांचा लाभ सर्व विभाग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय कंपन्यांना होणार असून, ते आता डिजिटल माध्यमांना अधिकृतरित्या शासकीय जाहिराती देऊ शकतात.या निर्णयामुळे डिजिटल माध्यमांना आर्थिक स्थैर्य मिळेल,शासनाच्या योजना आणि धोरणांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होईल,माहितीचा लोकांपर्यंत जलद आणि पारदर्शक पोहोच होईल.शासनाचे हे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून, त्याचा संकेतांक २०२५०६०३१५१४०९८७०७ आहे.हा आदेश अवर सचिव अ. धों. भोसले यांच्या डिजीटल स्वाक्षरीसह निर्गमित करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी एकमत दाखवत डिजिटल माध्यमांना जाहिराती सुरू करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच पत्रकार संघटनांकडून स्वागत करण्यात आले आले आहे.