no images were found
बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा या गावाजवळ भीषण अपघात
बुलढाणा : नागपूरहून पुण्याला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टर बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीवरून बसचा टायर फुटल्यानं अपघात झाला आहे. बस संरक्षक कठड्यावर आदळली. त्यानंतर उलटून काही क्षणातच बसने पेट घेतला. या अपघातात बसमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते यापैकी २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर चालकासह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडले. परंतु हायवेवरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी वेळीच मदत केली असती, तर आणखी जीव वाचले असते, असा दावा घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या काही जणांनी केला आहे. डोळ्यांदेखतच एका बाळाचा जळून मृत्यू झाल्याचंही एका व्यक्तीने सांगितलं.
भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.