
no images were found
पी. एम. किसान सन्माननिधी योजनेच्या लाभासाठी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता चेहरा प्रमाणीकरणाच्या माध्यमातून ई-केवायसी करता येणार आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यानेही शेतकऱ्यांसाठी‘ नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना सुरु केली आहे. योजनेची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण करावी. ई-केवायसी तथा बँक खात्याला आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास कृषी सहाय्यक तसेच ग्रामपंचायत आणि कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.
पी. एम. किसान निधी हा पात्र शेतक-यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासन वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपये जमा करेल. त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनातर्फे वार्षिक सहा हजार व राज्य शासनातर्फे वार्षिक सहा हजार असे एकुण १२ हजार रुपये जमा होतील. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देते. पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्याच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत मिळते. मात्र ९० हजार ९२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास या महिन्यात वितरण होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या १४ व्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे.
कशी करावी ई-केवायसीची प्रक्रिया : शेतकऱ्यांची यादी कृषी सहाय्यक व ग्रामपंचायतीत उपलब्ध आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची ई-केवायसी झाली नसल्यास कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. आपल्या नोंदणीची स्थिती जाणून घेण्यासाठी पुढील प्रणालींचा वापर करावा. पी. एम. किसान पोर्टलवरील फॉर्म कॉर्नर मधील ई-केवायसी ओटीपी आधारीत सुविधेद्वारे केवायसी प्रमाणिकरण करावे किंवा सुविधा केंद्रा मार्फत व केंद्र शासनाच्या पीएम किसान जीओएल अॅपद्वारे करावे. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमधून पीएम किसान जीओएल अॅप हे अॅप डाउनलोड करा. जुने पी एम किसान अॅप असल्यास त्यास डिलिट करुन पुन्हा पीएम किसान ॲप २.०० हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल करावे.
जीओएल अॅप वापरण्याची अशी आहे कार्यपद्धती : केंद्र शासनाने अँड्रॉइड मोबाईलवर फेस ऑथेंटिकेशन अॅपद्वारे पी एम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांचे केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेच्या माध्यामातून लाभार्थ्यांना स्वतः तसेच इतर लाभार्थ्यांचे ई-केवायसी सहजतेने पूर्ण करता येणार आहे.