no images were found
भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राच्या प्रगतीसाठी कुशल मनुष्यबळ आणि मानवी बुद्धिमत्ता महत्त्वाची – डॉ. प्रीती अदाणी
अहमदाबाद, : अदाणी युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. अदाणी युनिव्हर्सिटी मध्ये आयोजित ‘हार्डवेअर, इनोव्हेशन, प्रोसेसिंग अँड सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीज कॉन्क्लेव्ह (CHIPS) 2026’ या परिषदेत त्या बोलत होत्या. उद्योगाच्या गरजांनुसार शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
भारतामध्ये सेमीकंडक्टर उद्योग मजबूत करण्यासाठी केवळ आधुनिक उत्पादन केंद्रे उभारणे पुरेसे नाही, तर या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची रचना करणे, ते विकसित करणे आणि त्यात सुधारणा करणे यासाठी सक्षम असलेले कुशल मनुष्यबळही आवश्यक आहे. आपण तयार करत असलेली यंत्रे किती बुद्धिमान बनतात, यावर आपल्या तांत्रिक प्रगतीचे खरे मोजमाप होणार नाही. तर, चांगले भविष्य घडवण्यासाठी आपण मानवी बुद्धिमत्तेचा किती योग्य वापर करतो, यावर ते अवलंबून असेल,” असे डॉ. प्रीती अदाणी यांनी सांगितले.
भारताचे सेमीकंडक्टर क्षेत्रातील उद्दिष्ट केवळ चिप्स तयार करण्यापुरते मर्यादित नाही. चिप्सची रचना करणे, त्यांचे उत्पादन करणे आणि त्यांचे पॅकेजिंग करणे या क्षेत्रांतही कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’मुळे या क्षेत्राला गती मिळाली आहे. तसेच, धोलेरा आणि साणंद येथे सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे गुजरातची या क्षेत्रातील भूमिका अधिक मजबूत होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता, आधुनिक चिप्स, डेटा सेंटर्स आणि अखंडित वीजपुरवठा यांसारख्या आवश्यक सुविधांची मागणीही वाढत आहे.
अहमदाबाद येथे उभारण्यात येणाऱ्या अदाणी युनिव्हर्सिटीच्या आगामी बहुविद्याशाखीय जागतिक कॅम्पसमध्ये सेमीकंडक्टरची रचना, उत्पादन आणि पॅकेजिंग या क्षेत्रांतील कौशल्य विकसित करण्याची योजना आहे. याअंतर्गत तरुण अभियंत्यांसाठी विशेष अभ्यासक्रम, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्राध्यापकांच्या कौशल्यविकासासाठी उपक्रम राबवले जाणार आहेत. शैक्षणिक ज्ञान आणि संशोधन यांचा उद्योगाच्या गरजांशी मेळ घालण्यावर या उपक्रमांमध्ये विशेष भर दिला जाणार आहे.
या परिषदेत क्वालकॉम, एनएक्सपी सेमीकंडक्टर्स, मायक्रॉन टेक्नॉलॉजी, सिनॉप्सिस, सिरिल अमरचंद मंगलदास आणि इन्फिनिऑन टेक्नॉलॉजीज या कंपन्यांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या कंपन्या वायरलेस टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर चिप्सची रचना, मेमरी आणि डेटा स्टोरेज, पॉवर सिस्टीम्स आणि कायदेशीर सेवा अशा विविध क्षेत्रांत काम करतात. तज्ज्ञांनी सेमीकंडक्टर क्षेत्रातील विविध टप्प्यांवरील नवीन घडामोडी आणि उपलब्ध संधींबाबत माहिती दिली.
या परिषदेत तीन चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. ‘भारतातील सेमीकंडक्टर डिझाइनचे भविष्य’ या विषयावरील चर्चेत देशातील चिप्सची रचना करण्याची क्षमता कशी वाढवता येईल, यावर चर्चा झाली. ‘सेमीकंडक्टर उत्पादन : भारताच्या तांत्रिक भविष्याला आकार’ या चर्चेत सेमीकंडक्टर उत्पादन आणि देशाच्या तांत्रिक विकासातील त्याचे महत्त्व यावर भर देण्यात आला. ‘सेमीकंडक्टर क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या चर्चेत या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवीन नोकऱ्या, आवश्यक कौशल्ये आणि करिअरच्या विविध संधींबाबत चर्चा करण्यात आली.
CHIPS 2026 या परिषदेचे आयोजन आयआयटी मंडी, व्हीएलएसआय तंत्रज्ञान (VLSI) आणि त्याच्या उपयोगांना प्रोत्साहन देणारी व्यावसायिक संस्था ‘व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडिया’ आणि भारतातील आघाडीची कायदा संस्था ‘सिरिल अमरचंद मंगलदास’ यांच्या सहकार्याने करण्यात आले. या परिषदेत गुजरात राज्य इलेक्ट्रॉनिक्स मिशन, सेमीकंडक्टर कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. संशोधन आणि तांत्रिक शिक्षण यांचा उद्योग क्षेत्राच्या गरजांशी मेळ कसा घालता येईल, यावर या परिषदेत चर्चा करण्यात आली.