no images were found
महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला; जितेंद्र आव्हड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
ठाणे:- राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नौपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आला आहे.काल सायंकाळी ६.४५वाजता अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केला. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी सचिव आहेत. आव्हाड यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व त्यांच्या कुटूंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये सुभाषसिंह ठाकूर उर्फ बाबाजी यांना सुपारी दिल्याचे संभाषण आहे. आहेर यांचीच ही धमकीची क्लिप असल्याचं सांगत आव्हाड समर्थकांनी आहेर यांना चोप दिला. त्यामुळे आहेर यांनी नौपाडा पोलिसात धाव घेतली होती.
भादंवि कलम ३५३, ३०७, ३३२,५०६(२),१४३, १४८,१४९,१२० (ब) सह आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नगरपालिका अधिनियम ३/२५, ४/२५ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.