
no images were found
अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती; विमानतळावर प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे
कोल्हापूर : चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातल्याने भारतामध्येही कोरोना प्रतिबंधात्मक निर्णयांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांसाठी अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्तीचा होणार आहे.
चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक झाल्याने केंद्र सरकारने धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. कोल्हापूर विमानतळावरही आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. कोल्हापूर विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या इतर सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
केंद्रीय स्तरावर काल बैठक झाल्यानंतर राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना आणि गोवर संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाची काल बैठक झाली, यामध्ये राज्यातील महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला पंचसूत्री राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय इतर अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी राज्यात ७ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. प्रत्येक आरटीपीसीआर चाचणीतून कोरोना बाधित नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवणे. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेट आणि कोरोना नियम या पंचसूत्रीचा वापर करावा. तसेच प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेनं आरटीपीसाआर चाचण्या वाढवाव्यात, असं सांगण्यात आलं आहे