no images were found
जयंत पाटलांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून सांगली, कोल्हापुरात जोरदार निदर्शने
कोल्हापूर/ सांगली : आ. जयंत पाटील यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद आज राज्यभरात उमटले. काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली, तर काही ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूरमध्ये कागलमध्ये राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. सांगली आणि मिरजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
आ. जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. कागलच्या गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, प्रदेश सरचिटणीस नवीद मुश्रीफ, दलितमित्र बळवंतराव माने, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष संजय चितारी, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते आदी प्रमुख उपस्थित होते.
सरकार गैरव्यवहार आणि काळी कृत्ये झाकण्यासाठीच प्रचंड दडपशाही करीत असल्याचा प्रताप उर्फ भैया माने यांनी केला. दडपशाही करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा धिक्कार असो, शिंदे- फडणवीस सरकारच करायचं काय?खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच, इस्लामपूरमधील कचेरी चौकात तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, निषेध मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाल्याने इस्लामपूर पोलीसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी यांनी बंदी आदेश लागू केला आहे. या आवाहनास प्रतिसाद देवून आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही, अशी हमी दिल्याने त्यांना समज देवून सोडण्यात आले.
जयंत पाटील यांना विधानसभेमधून निलंबित करण्यात आल्याचे संतप्त पडसाद सांगलीच्या मिरजेमध्येही उमटले. सांगली आणि मिरजमध्ये राष्ट्रवादीकडून शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जयंत पाटील यांच्यावर केलेल्या निलंबन कारवाईचा निषेध नोंदवला. जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या, अशी जोरदार मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आटपाडीत शिंदे-फडणवीस सरकारविरोधी जोरदार आंदोलन करण्यात आले.