no images were found
‘सुधारणा उत्सव २०२६’ अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रशासकीय सुधारणांसाठी सूचना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या “सुधारणा उत्सव २०२६” या अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रशासकीय सुधारणांसाठी सूचना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सुधारणा उत्सव २०२६ ची बैठक पार पडली. या प्रसंगी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, डॉ. अरुण धोंगडे, पांडुरंग लाड, किरण मोरे, जिल्हा प्रशासनातील सर्व संबंधित प्रमुख अधिकारी, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या “सुधारणा उत्सव २०२६” या राष्ट्रव्यापी अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यासाठी नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागातून प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व सेवा वितरण प्रणालीमध्ये रचनात्मक आणि पद्धतशीर सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. असे सांगून ते म्हणाले, “सुधारणा उत्सव” या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या दैनंदिन अनुभवातून शासकीय सेवा मिळताना होणारा विलंब, अनावश्यक प्रक्रिया, दस्तऐवजांची पुनरावृत्ती आणि मंजुरीचे किचकट टप्पे दूर करून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकभिमुख करणे हा मुख्य हेतू आहे.
या अभियानांतर्गत दिनांक २ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “जन मंथन” उपक्रम राबविण्यात येईल. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक जन मंथन सभा आयोजित केली जाईल. नागरी भागातही विशेष बैठकांचे आयोजन केले जाईल. याबाबत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या सूचना “रिफॉर्म उत्सव पोर्टल द्वारे नोंदवा. या अभियान अंतर्गत जिल्ह्यात सोशल मीडिया, प्रसारमाध्यम, शैक्षणिक संस्था आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. “शासकीय सेवा वितरण अधिक सुलभ व परिणामकारक बनवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सर्व घटकांनी ‘सुधारणा उत्सव २०२६’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रशासकीय प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना नोंदवाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
हे अभियान वैयक्तिक तक्रारींच्या निवारणासाठी नसून, संपूर्ण यंत्रणेत सुधारणा घडवून आणणाऱ्या व्यापक व संरचनात्मक सूचनांसाठी आहे. तंत्रज्ञानाचा वापर, प्रक्रियेचे सुलभीकरण आणि कागदपत्रांची अट शिथिल करणे याबाबतच्या सूचनांना प्राधान्य दिले जाईल. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी या बैठकीत दिली.