no images were found
वसुली वाढवा, शहर विकासाच्या पाच प्रमुख कामांवर लक्ष केंद्रित करा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
कोल्हापूर, : घरफाळा, पाणीपट्टी, नगररचना, परवाना व इस्टेट विभागांनी वसुली वाढविण्यावर भर द्यावा. पुढील पाच महिने वसुलीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, थकबाकीदारांवर नियोजनबद्ध कारवाई करावी. त्याचबरोबर शहराच्या विकासासाठी वॉटर ऑटोमायझेशन, मुख्य मार्ग, चौक व रस्ते स्वच्छता, जीआयएस मॅपिंग, गांधीनगर माहिती संकलन आणि डी.पी. रोड या प्रमुख कामांवर सर्व विभागप्रमुखांनी लक्ष केंद्रित करावे. या कामांसाठीच्या निविदांना आचारसंहिता संपल्यानंतर मंजुरी घेऊन त्या तातडीने प्रसिद्ध कराव्यात अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आयोजित विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा, वसुलीचा आणि शहर विकासाच्या प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला.
परवाना विभागाकडे विभागीय कार्यालयनिहाय किती अर्ज प्राप्त झाले, किती परवाने वितरित करण्यात आले आणि किती अर्ज प्रलंबित आहेत याचा आढावा संबंधित विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्तांनी दर आठवड्याला घ्यावा असे निर्देश आयुक्तांनी दिले. इस्टेट विभागाने मटण मार्केटसाठी मंजूर केलेल्या धोरणानुसार शहरातील इतर मार्केटमधील गाळेधारकांकडूनही वसुली करावी. शहरातील अधिकृत फेरीवाल्यांपैकी सुमारे ३,५०० फेरीवाल्यांचे अर्ज व कागदपत्रे प्राप्त झाली आहेत. या अर्जांची छाननी करून पात्र फेरीवाल्यांना लवकरात लवकर क्यूआर कोड वितरित करावेत. अर्ज प्राप्त फेरीवाल्यांना सात दिवसांत छाणणी पुर्ण करुन पैसे भरण्याची मुदत दयावी. त्यानंतर अनधिकृत नियमानुसार कारवाई करावी असेही निर्देश दिले.
घरफाळा व पाणीपट्टी विभागाने मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करावी. शासकीय कार्यालये तसेच शाळा व महाविद्यालयांकडील थकबाकी वसुलीसाठी संबंधितांना पत्रव्यवहार करावा, अशा सूचना देण्यात आल्या. रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी चारही विभागीय कार्यालयांच्या स्तरावर अतिक्रमण निर्मूलनाची वाहने दररोज कार्यरत ठेवावीत. शहरातील खासगी पार्किंगधारकांनी आवश्यक परवाने घेतले नसल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच डॉग शेल्टरच्या कामासाठी लाईन आऊट देऊन प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी इन्टा पॅचवर्कची दोन वर्षांच्या कालावधीची निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना देण्यात आल्या.
केएमटीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने नवीन बसगाड्यांमध्ये जाहिराती करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. तसेच महापालिकेला मंजूर झालेल्या १५३ पदांच्या भरतीसाठी शासनमान्य नामांकित कंपनीमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या दृष्टीने संबंधित कंपन्यांचे सादरीकरण आयोजित करावे. भरती प्रक्रियेसाठी आवश्यक रोस्टरची तपासणी पुणे व मुंबई येथून पूर्ण करून घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.
सीएसआर च्या माध्यमातून उद्याने व दुभाजकांचा विकास
शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांची रंगरंगोटी आणि महापालिकेच्या उद्यानांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सहायक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मोठे मॉलधारक तसेच सोने-चांदीच्या शोरूमधारकांकडून सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्यावा. संबंधित आस्थापनांच्या परिसरातील दुभाजकांची रंगरंगोटी तसेच जवळील उद्यानांची दुरुस्ती करून घेण्याचे नियोजन करावे असे सहा.आयुक्तांना निर्देश दिले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी उपलब्धतेचे नियोजन
दुष्काळाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर शहरातील विहिरी, पंप आणि बोअरवेल पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून पाणी उपलब्धतेचे नियोजन करण्यावर भर द्यावा असेही आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले.
या बैठकीत वसुली, अतिक्रमण निर्मूलन, परवाना वितरण, शहर स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांशी संबंधित कामांचा आढावा घेऊन सर्व विभागप्रमुखांनी निश्चित उद्दिष्टांनुसार कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता जयेश जाधव, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, उपशहर अभियंता मिलिंद जाधव, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, सहायक अभियंता नारायण पुजारी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, रवका अधिकारी सुनील बिद्रे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, परवाना अधीक्षक अशोक यादव, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे आणि मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.