no images were found
जी एच रायसोनी स्मृती सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ;
कोल्हापूर (प्रतिनिधी):- अयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर येथील चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेले जी. एच. रायसोनी स्मृती १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.
जयसिंगपूर, इचलकरंजी, पेठवडगाव, वारणानगर, कोडोली,गडहिंग्लज, कागल, उत्तुर, पन्हाळा व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत बहात्तर बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यापैकी २० बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन व कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांनी या स्पर्धा पुरस्कृत केल्या आहेत. युनिव्हर्सल सेक्युरिटी सिस्टीम चे कॅप्टन उत्तम पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महालक्ष्मी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश पाटील, छत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपटू विजय जाधव, डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी जिमखाना प्रमुख डॉ.राजेंद्र रायकर व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, उपाध्यक्ष धीरज वैद्य, कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी,राष्ट्रीय पंच आरती मोदी व नंदकुमार वाली उपस्थित होते.
यावेळी खेळाडूंना व पालकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर राजेश पाटील म्हणाले की, मुलांनी मूळ भारतीय बुद्धिबळ खेळ चांगला आत्मसात करून त्यात प्रावीण्य मिळवावे.. त्यामुळे मुलांना शिक्षणात व जीवनात प्रगती साधता येते. यासाठी पालकांनी तज्ञ प्रशिक्षिकांचे मार्गदर्शन घेऊन सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर मुलींच्या गटात अग्रमानांकित दिव्या पाटील, दिशा पाटील व सिद्धी कर्वे या जयसिंगपूरच्या तीन मुलींनी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. तर मुलांच्या गटात द्वितीय मानांकित इचलकरंजीचा अथर्व तावरे, तृतीय मानांकित कोल्हापूरचा व्यंकटेश खाडे पाटील, सातवा मानांकित प्रथमेश व्यापारी (कोल्हापूर ), आठवा मानांकित अर्णव पोर्लेकर (कोल्हापूर ) सहावा मानांकित सर्वेश पोतदार कोल्हापूर व विसावा मानांकित अविरत दीक्षित कोल्हापूर हे सहा जण तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.