no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत राशीच्या प्रियकराचे छुपे दुर्गुण पाहून पुष्पा चिंतित
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेची नायिका पुष्पा (करुणा पांडे) हिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. पुष्पा एक सामान्य पण असामान्य धडाडी असलेली स्त्री आहे. प्रत्येक संकटाचा ती चिकाटीने आणि दृढतेने सामना करते. या मालिकेत तिचा गृहिणीपासून ते एक वकील होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. आपले लक्ष्य साध्य करताना तिने कोणत्याही संकटांना न जुमानता स्वतःवरील विश्वास अबाधित ठेवला आहे.
आगामी भागांमध्ये, एका विशिष्ट परिसरातून अनेक रुग्ण येत असल्याच्या प्रकरणाचा छडा लावताना तिला माघार घेण्यासाठी एक गंभीर स्वरूपाची चेतावणी मिळाली आहे. असे असूनही ती आपले काम चालू ठेवते. पत्रकारांना भेटते, PIL दाखल करते, नवीन पुरावे शोधण्याची खटपट करते त्यामुळे तिला असलेला धोका देखील वाढतो आहे. याच सुमारास, आपली मुलगी राशी (अक्षया हिंदळकर) हिचे ज्याच्याशी लग्न ठरले आहे, तो ऋषभ (श्रेय मारडिया) एक जेवण ठेवतो आणि दोन्ही कुटुंबांना एकत्र येण्याची, एकमेकांना भेटण्याची संधी देतो. स्वतःच्या तपासकामामुळे पुष्पा या ठिकाणी थोडी उशिरा पोहोचते. ती उशिरा आल्याबद्दल आधी ऋषभची आई तिला टोमणा मारते आणि मग ‘आम्ही रात्री 8 नंतर जेवत नाही’ असे सांगून तिला जेवण देण्याचेही टाळले जाते. पुष्पाला सगळ्यात जास्त धक्का बसतो, तो ऋषभचा संताप आणि त्याचे विक्षिप्त वागणे पाहून. त्याचा आक्रमक स्वभाव पाहून तिला राशीच्या भविष्याची चिंता वाटू लागते, कारण दुसरीकडे, राशी त्याच्या कुटुंबाला प्रभावित करण्यासाठी धडपड करत आहे.
हा धोक्याचा इशारा मिळाल्याने पुष्पा चिंतित होते– असे विचित्र वागणे असलेल्या लोकांमध्ये राशी रुळेल का?
पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे महणते, “पुष्पासाठी हा टप्पा भावनिक आहे, कारण न्यायासाठी लढताना ती निडर असते, पण ऋषभ आणि त्याच्या कुटुंबाच्या स्वभावात तिला धोक्याचा इशारा मिळाला आहे. पुष्पा बघते की राशी आपल्या सासरच्या लोकांना प्रभावित करण्यासाठी किती प्रयत्नशील आहे. पण त्या सौम्य सपाटीखाली चाललेली तिची धडपड पुष्पाला दिसते आहे. एक आई म्हणून ही चिंता तिच्या मनात घर करून राहते. राशी अशा वातावरणात रुळेल का आणि सुखी होईल का याबद्दल ती साशंक आहे. मला वाटते, प्रेक्षकांना हे एपिसोड खूप आवडतील आणि संबद्ध वाटतील. कारण यात अशा वेगवेगळ्या परिस्थिती दाखवल्या आहेत, ज्यातून मिळणाऱ्या धोक्याच्या इशाऱ्याकडे लोक बऱ्याचदा दुर्लक्ष करत असतात.”