no images were found
पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सोयी पुरवा-चंद्रकांतदादा पाटील
पुणे : पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अधिक महिन्यामुळे दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी प्रस्थान होत असल्याने उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
विधान भवन पुणे येथे झालेल्या आषाढी वारी पालखी सोहळा-2023 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, अधिकाधिक टँकर ठेवावेत. पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी. रुग्णवाहिका वाढवाव्यात. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. पुणे शहरात महानगरपालिकेने पालखीच्या मार्गावर प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर पाणी, आरोग्य पथक, शौचालयांची व्यवस्था आदींसाठी मंडप (पेंडॉल) टाकण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातही पालखी तळ आणि विसाव्याच्या दरम्यान अशी व्यवस्था करता येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.
आळंदी, देहू, सासवड आदी ठिकाणी पालखीप्रस्थानापूर्वी मुक्कामास येणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात. पालखीच्या अनुषंगाने पालखी मुक्काम, विसावा आणि मार्गावरील गावांना देण्यात येणारे अनुदान लवकरात लवकर देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधूतून वा जिल्हा परिषदेने निधी देण्याच्या अनुषंगाने पर्याय तपासून कार्यवाही करावी, असेही श्री. पाटील म्हणाले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी या मोठ्या पालख्यांबरोबरच अन्य सर्व पालख्यांच्या मार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावेत, साईड पट्ट्या भराव्यात. रस्त्यांच्या डागडुजीचे प्रस्ताव तात्काळ सादर करून पालखी प्रस्थानापूर्वी सर्व कामे पूर्ण करुन घ्या. हरीत वारी आणि निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग घ्या. 10 हजार वृक्षलागवडीचे नियोजन करा, असेही पालकमंत्री म्हणाले.