no images were found
‘कोण होणार करोडपती’, २९ मे पासून सोम ते शनि रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर!
पुणे, : ‘कोण होणार करोडपती’मध्ये आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्यासाठी अनेक जण आपले नशीब आजमावत असतात. येत्या २९ मेपासून ‘कोण होणार करोडपती’चे नवे पर्व सोनी मराठी वाहिनीवर सुरू होते आहे. यंदा बक्षिसाची रक्कम दुप्पट म्हणजे दोन करोड रुपये करण्यात आली आहे. या पर्वात सहभागी होण्यासाठी मिस कॉल करणे आवश्यक होते. यासाठी देण्यात आलेल्या क्रमांकावर या वेळी तब्बल १४ लाख लोकांनी मिस कॉल देत या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ‘कोण होणार करोडपती’च्या टीमने दिली.
या वेळी बोलताना ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालक, सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले, ‘आता मागे नाही राहायचं, आपल्या माणसाला जिंकताना बघायचं, अशी या पर्वाची टॅग लाईन आहे. प्रत्येक मराठी माणसाची थोड्याफार प्रमाणात अशीच मानसिकता असते. आपण अधिक सावधपणे पावलं टाकत असतो. मी नाटकांमध्ये काम करायचो, तेव्हा मालिकांबद्दल विचारणा व्हायची तर मी पण असाच, जाऊ दे ना कशाला . . बरं चाललंय ना, अशी माझीही मानसिकता असायची. पण एक पाऊल तसंच पुढे टाकताना आपण एक पाऊल मागे जात असतो. त्यामुळे आता मागे नाही राहायचं. मला नेहमी वाटतं की, सामान्य ज्ञानाचा अभ्यास कसा करणार? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक स्पर्धक या खेळात येतात. पण स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे सगळी तयारी नाही. कारण सर्वच स्पर्धक अभ्यास करून आलेलेच असतात, पण हॉट सीटवर बसल्यावर काही सुचतच नाही. अशा वेळी स्पर्धकांना रिलॅक्सिंग वातावरण तयार करून देणं ही मोठी जबाबदारी असते माझ्यावर.’
‘कोण होणार करोडपती’मधील ‘कोण हा त्या वेळी हॉट सीटवर बसलेला व्यक्ती असेल असे, व्यक्तिचित्र निर्माण करणारा प्रत्येक भाग येणार आहे. त्या प्रत्येक स्पर्धकाचा व्हिडिओ तर असणारच आहे. पण प्रेक्षकांना खेळापेक्षा जास्त त्या स्पर्धकाविषयी कळावे यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. कारण त्या दिवशी तो किंवा ती स्पर्धक नायक असणार आहे.
सोनी मराठीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले, ‘कोण होणार करोडपती’चे हे नवे पर्व आपल्या भेटीला येत आहे. या पर्वाची वैशिष्ट्ये म्हणजे, यंदा बक्षिसाची रक्कम दुप्पट म्हणजे दोन करोड रुपये करण्यात आली आहे. शिवाय यंदा १५ ऐवजी १६ प्रश्नांचा खेळ असणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वात सहभागी होण्यासाठी १४ लाख मिस कॉल आले आहेत. ही संख्या मागच्या वर्षापेक्षा दुपटीने जास्त आहे. त्यांतील दोनशे स्पर्धकांची निवड या पर्वासाठी करण्यात आली आहे.सोनी मराठीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अमित फाळके म्हणाले, एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे आणि ‘कोण होणार करोडपती’चं सूत्रसंचालन करणं ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कारण या कार्यक्रमात तांत्रिक बाबी अधिक आहेत. सचिन खेडेकर यांच्या प्रत्येक शब्दावर हा खेळ पुढे सारकतो. मात्र बॅक ऑफ द स्टेज अनेक तंत्रज्ञ त्या वेळी काम करत असतात.