no images were found
कलाकार फादर्स डेच्या निमित्ताने साजरे करत आहेत पितृत्व
फादर्स डे चे औचित्य साधून सोनी सबवरील कलाकार पितृत्वाविषयी त्यांचे व्यक्तिगत अनुभव आणि विचार शेअर करत आहेत- पित्याची भूमिका जितकी सार्थकता देणारी असते, तितकीच आव्हानात्मक देखील असते. अभिनेता जयेश मोरे, सुमित राघवन, आरव चौधरी आणि जयेश भारभाया सांगत आहेत पितृत्वासोबत त्यांना मिळालेला आनंद, जबाबदाऱ्या आणि धडा! त्यांच्या मुलांशी असलेले त्यांचे नाते कसे खास आहे, त्यांच्यात कोणती मूल्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि पितृत्वामुळे पडद्यावर आणि पडद्याच्या मागे त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला याविषयी हे कलाकार मोकळेपणाने बोलत आहेत.
‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “मी जर कामात नसेन, तर फादर्स डे मी घरी माझ्या मुलांसोबत साजरा करतो. मला वाटते की मी एक सक्रिय पिता आहे- घरी आणि पडद्यावरील माझ्या सखी आणि अथर्व या मुलांसाठी देखील. माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांशी माझे घट्ट नाते आहे. माझ्यासाठी ते माझे सुपरहीरो आहेत. मला माहीत आहे, असे सांगणारा मी काही पहिला मुलगा नाही! पण ते खरोखर एक नायक आहेत, ज्यांनी माझे व्यक्तिमत्व घडवले आहे. माझ्या चाहत्यांना मी हेच सांगेन की, आपल्या माता-पित्याचा नेहमी आदर करा कारण ते आपले गुरु असतात. आपण त्यांना प्रेम दिले पाहिजे आणि त्यांची प्रेमाने काळजी घेतली पाहिजे.”
‘वीर हनुमान’ मालिकेत केसरीची भूमिका करणारा आरव चौधरी म्हणतो, “माझ्या मते, पितृत्व ही पुरुषाला मिळालेली सर्वात दमदार आणि विनम्र करणारी भूमिका आहे. पितृत्व म्हणजे केवळ संरक्षण आणि पोषण नाही, तर सचोटी, संयम आणि सहानुभूतीने एखादे आयुष्य घडवणे. मला वाटते पित्याने स्वतःचे उदाहरण देऊन मुलाला मार्गदर्शन करायचे असते. आपल्या कृतीमधून धैर्य दाखवून द्यायचे असते. आणि हे देखील शिकवायचे असते की, खरी ताकद ही दया आणि मूक लवचिकतेत असते. आपली मूल्ये आणि निवडी यामधून आपण जो वारसा पुढे नेतो, तोच आपल्या मुलांमध्ये रुजतो. हनुमानाचा पिता केसरीची भूमिका करताना मी अभिमान अनुभवतो.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत बापोद्राची भूमिका करणारा जयेश भारभाया म्हणतो, “बापोद्रा म्हणून मी जरा भडक आणि हेकट असलो तरी माझी मुलगी प्रार्थना हिच्या बाबतीत मात्र माझ्यातला हळुवारपणा दिसून येतो. पडद्यावरच्या आमच्या नात्यात प्रेम, काळजी आणि एक मूक समजूतदारपणा आहे. हे खास होण्याचे कारण म्हणजे पडद्याच्या मागे देखील आमचे नाते असेच आहे. शूटिंग करताना आमच्यात एक आपलेपणा आणि मोकळेपणा असतो. मला ती खरोखर माझी मुलगी असल्यासारखीच वाटते. या फादर्स डे च्या निमित्ताने मी माझी ही भावना व्यक्त करू इच्छितो की मला या गोष्टीचा आनंद वाटतो की, मला या मालिकेत अशा एका पित्याची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे, ज्याच्यात वेगवेगळे स्तर आहेत. त्याचा एक भावनिक प्रवास आहे आणि पडद्यावर आणि पडद्याच्या मागे देखील मला पितृत्व अनुभवण्याची संधी ही भूमिका देते.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दिलीप पटेलची भूमिका करणारा जयेश मोरे म्हणतो, “या मालिकेत सुरुवातीला माझी व्यक्तिरेखा चांगल्या पित्याची नव्हती. पण जेव्हा त्याला आपली मुले अश्विन, चिराग आणि दीप्ती यांना आधार देण्याचे महत्त्व उमगले, त्यानंतर त्याच्या स्वभावात परिवर्तन आले. सुरुवातीला दिलीपमध्ये नकारात्मक छटा होत्या पण आज तो त्याच्या कुटुंबाचा खंबीर आधार बनला आहे. या फादर्स डे च्या निमित्ताने, मला दिलीपचा सगळा प्रवास आठवला. पडद्याच्या मागे देखील या सगळ्या कलाकारांशी माझे छान नाते आहे. खास करून देशना, जी माझी सगळ्यात धाकटी मुलगी आहे, तिच्याशी माझे अधिक घट्ट नाते आहे. बऱ्याचदा ती परीक्षेच्या वेळी देखील माझे मार्गदर्शन घेते. खरोखर या सेटवर मी दुसरे कुटुंब मिळवले आहे, असे मला वाटते.”