no images were found
विधान परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणीस आले एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चांना आले उधाण
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. महाविकास आघाडीकडून शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे राजकीय सत्तासंघर्षामुळे एकेकाळी मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांमध्ये वितुष्ट आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर यथेच्छ टीका केली आहे, एकमेकांची उणीदुणी काढली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मित्रत्त्वाच्या नात्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला आहे. मात्र, या सगळ्याला छेद देणारे चित्र गुरुवारी विधानभवनात पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केल्याचे हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील बसला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी हे दोन्ही नेते विधानभवनाच्या आवारात एकत्र दिसून आले. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवता एकमेकांशी गप्पा मारल्या. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होते. एकमेकांशी छान गप्पा मारत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधिमंडळात गेले.. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे इतर आमदार उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यातही मजेशीर संवाद पाहायला मिळाला होता. शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणीस एकत्र आले का अशा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“यामध्ये वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. विरोधीपक्ष नेहमी आमच्या समोरच असतो. आम्ही रोज भांडतो पण त्यामुळे हे जुळवाजुळव करुन झालं असे म्हणण्याचे कारण नाही. विधानसभेमध्ये एकमेकांवर टीका करणे सुरुच असते. त्यामुळे आज भेटले म्हणून वेगळं काही आहे असे म्हणण्याचे कारण नाही. 30 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि आता ते वेगळे झाले. त्याला काही ईलाज नाही. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा समोर आल्यानंतर एकमेकांना भेटत असतो. त्यामुळे आम्ही कायमचे शत्रू नाहीत”, असे गिरीश महाजन म्हणाले.