no images were found
दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रिम मिळणार
· मदतीसाठी ७ हजार ५०० कोटींच्या तरतुदीस मान्यता
राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ही अग्रिम मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे. यासाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्य शासन दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी देण्यात येणाऱ्या मदतीची पीक वर्गवारी व क्षेत्रनिहाय तपशील सर्व्हेक्षणाद्वारे अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या दरम्यान आगामी दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे पाऊल म्हणून दुष्काळ जाहीर केलेल्या ३०४ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना अग्रिम स्वरुपात पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार या दुष्काळी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रूपये अग्रिम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे मदत जमा करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ ते आतापर्यंत विविध शासकीय योजनांतर्गत ई-केवायसी केली आहे, त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जाणार नाही. ज्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांना अजूनही ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर्स आयडी) मिळालेला नाही, त्यांना ई-केवायसी आधारेच अग्रिम दिली जाईल. ही अग्रिम मदत दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यासाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. हा निधी उपलब्ध करून देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.