no images were found
टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ६ नोव्हेंबर रोजी पेंशन अदालत
कोल्हापूर, : टपाल विभागातून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या वतीने शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मासिक पेंशन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
टपाल विभागातून निवृत्त झालेले किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब निवृत्तीवेतनधारक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील ज्या निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारींचे तीन महिन्यांच्या आत निराकरण झालेले नाही, अशा प्रकरणांचा या पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार आहे. मात्र, पूर्णपणे कायदेशीर स्वरूपाची प्रकरणे, वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे, धोरणात्मक बाबी, शिस्तभंगाची प्रकरणे तसेच विभागीय पदोन्नती समितीच्या (डीपीसी) पुनरावलोकनासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.
संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिक स्वरूपात, एकत्रित किंवा इतरांच्या वतीने न पाठवता, विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये बुधवार, ४ नोव्हेंबर पर्यंत सादर करावी. तक्रार वरिष्ठ लेखा अधिकारी/सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी.ओ. इमारत, पहिला मजला, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर पाठवावी. तसेच accts.mh@indiapost.gov.in या ई-मेल पत्त्यावरही तक्रार पाठवता येईल. संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी विहित मुदतीत तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आले .