no images were found
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कामकाज होणार पेपरलेस : शिक्षणाधिकारी भास्कर पाटील
शिक्षकांना एकाच व्यासपीठावर आणून शिक्षण क्षेत्राशी निगडीत माहितींचे आदान प्रदान करण्यासाठी जिल्हा परिषदेने आचार्य विनोबा अॅप विकसित केले आहे. हे अॅप जिल्हा परिषदेने शिक्षकांसाठी खुले केले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत शिक्षण विभागाचे कामकाज याच अॅपमुळे पेपरलेस होईल, असा विश्वास जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद व ओपन लिंक फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी आचार्य विनोबा भावे शिक्षक समृद्धी अॅप विकसीत करण्यात आले आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, ओपन फाउंडेशनचे सीईओ संजय दालमिया यांच्या उपस्थितीत हे अॅप शिक्षकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. विस्तार अधिकारी रविंद्र कापरे, गटशिक्षणाधिकारी बुगे यांच्यासह, अशोक पंडीत शोभा शेंडगे, कोअर टिममध्ये असलेल्या दहा शिक्षकांचा येरेकर यांनी गौरव केला.
या अॅपमुळे शिक्षक शिक्षणाचा दर्जा उंचावणार आहे, तसेच माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व शासन निर्णय, संचालयक कार्यालयातील पत्रे एका क्लिकवर उपलब्ध होतील. वार्षिक, मासिक, साप्ताहिक व घटक नियोजन तसेच शैक्षणिक कॅलेंडर आहे. शिक्षकही याच व्यासपीठावर एकमेकांच्या थेट संपर्कातील राहतील. वर्गातील, शाळेतील व केंद्रातील उपक्रम या अॅपवर टाकून इतर शिक्षकांनाही शेअर करता येणार आहेत. यातून नवीन अध्ययन व अध्यापन पद्धतीची माहिती एकाचवेळी सर्व शिक्षकांना देता येईल. जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. येरेकर म्हणाले, हे अॅप शिक्षकांना समृद्ध करणारे आहे. त्याचा वापर करून शिक्षकांनी आपले अध्यापन समृद्ध करावे असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेने शिक्षण विभागाचे कामकाज पेपर लेस करण्यासाठी विनोबा ॲप खुले केले आहे.
दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांना प्रोत्साहन देणे, अध्ययन व अध्यापन पद्धतीत सुधारणा, केंद्रप्रमुख व साधनव्यक्तींसाठी उपयुक्त, शिक्षकांचा वेळ वाचणार, शैक्षणिक गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे, कला, कार्यानुभव, संगीत व क्रीडा उपक्रमांची देवाण-घेवाण, शैक्षणिक साहित्यही एकाचवेळी सर्वांसाठी खुले होईल; हा या अॅपचा उद्देश आहे.