
no images were found
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी यांची आजरा तालुक्यातील शाळांना प्रेरणादायी भेट
कोल्हापूर, : प्राथमिक शिक्षण हक्क अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांची 100 टक्के पटनोंदणी साध्य करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये “शाळा प्रवेशोत्सव” कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज आजरा तालुक्यातील किटवडे धनगरवाडा व शेळप येथील शाळांना प्रेरणादायी भेटी दिल्या.
शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने प्रवेशित बालकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. फुले, फुगे, गोड पदार्थ व आनंददायी वातावरणात विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेशांचे वाटप तसेच पोषण आहाराचा लाभ मिळाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध भौतिक सुविधा, शिक्षकांची उपस्थिती याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमात संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच, शासकीय अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गावोगावी पारंपरिक आणि आनंददायी पद्धतीने साजरा झालेला हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मकता निर्माण करणारा ठरला.