no images were found
पेट्रोल-डिझेल इंधनाने भरलेला टँकर चालकास हृयविकाराचा झटका आल्याने दुभाजकावर धडकला
उड्डाणपुलावर टँकर चढत असताना चालकास हृयविकाराचा झटका आल्याने पेट्रोल-डिझेल इंधनाने भरलेला टँकर दुभाजकावर धडकला; मागे कोणतेही वाहन नसल्याने सुदैवाने अनर्थ टाळला.
अकोला : पेट्रोल-डिझेल इंधनाने भरलेला टँकर शहरातील कारागृहासमोर उड्डाणपुलावर २०० फूटवर आला असता अचानक चालकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चालक बेशुद्ध झाल्याने टँकर अनियंत्रित होऊन वेगाने उताराच्या दिशेने येऊन दुभाजकावर धडकला.
दरम्यान सुदैवाने ट्रकच्या मागे कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. चालकाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माणिकराव रामराव महिंद्रे (वय ५५, रा. रविनगर, अमरावती) असे मृत चालकाचे नाव आहे.
या टँकर चालकाने सहा हजार लिटर पेट्रोल व सहा हजार लिटर डिझेल या टँकरमध्ये भरून अमरावतीच्या दिशेने ते गुरुवारी दुपारी निघाले. अकोला शहरामधील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलावरून दर्यापूर मार्गे ते अमरावती येथे जाणार होते. उड्डाणपुलावर टँकर चढत असताना जवळ जवळ २०० फूट अंतरावर गेला असता अचानक माणिकराव महिंद्रे यांना हृयविकाराचा झटका आला. त्यामुळे टँकर अनियंत्रित होऊन वेगाने मागे घेऊन दुभाजकावर आदळला. टँकर पूर्ण इंधनाने भरला असल्याने मागे कोणतेही वाहन असते तर मोठी हानी झाली असती. परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ऑटोचालकांनी त्वरित टँकरचालकास सर्वोपचार रुग्णालयात नेले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.