no images were found
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू बाबत सरकारने उत्तर द्यावं
नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय तृतीय स्तरावरील रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी वेगवेगळ्या भागातून रुग्ण येत असतात. मात्र याच रुग्णालयामध्ये 1 ऑक्टोंबरपासून ते 24 तासांमध्ये 24 मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 12 नवजात बालकांचा आणि काही प्रौढ रुग्णाचा समावेश आहे. या सर्व घटनेप्रकरणी रुग्णांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. तर दुसऱ्या बाजूला योग्य वेळेत उपचार न केल्यामुळे आणि योग्य औषधे न पुरवल्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, हे सर्व आरोप रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आले आहे तसेच, 24 रुग्ण दाखल होण्यापूर्वीच अत्यावस्थेत होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व घडलेल्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हॉस्पिटलमध्ये काय झाले याबाबत अधिक माहिती घेतली जाईल आणि योग्य कारवाई केली जाईल” असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्याचबरोबर, रुग्णालयात घडलेल्या सर्व घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे.