
no images were found
वडिलांच्या अमृतमहोत्सवानिमित्त परभणीच्या कृषी विद्यापीठास कृतज्ञता निधी
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ.निखील गायकवाड यांचा उपक्रम
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. निखिल गायकवाड यांनी आपल्या निवृत्त प्राध्यापक वडिलांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांची मातृसंस्था असलेल्या परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठास साडेसात लाख रुपयांचा कृतज्ञता निधी प्रदान केला. या निधीमधून एन्टॅमॉलॉजी या विषयात एमएस्सी आणि पीएच.डी. मध्ये अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील डॉ. निखिल गायकवाड यांचे वडिल डॉ.बब्रुवान भानूदास गायकवाड यांचे कृषी पदवी व पदव्युतर शिक्षण परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातून १९६६ ते १९७२ या कालावधीत झाले. शिक्षणानंतर ते याच विद्यापीठात एन्टॅमॉलॉजी विभागात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७५ ते १९९० या कालावधीत ते तेथे कार्यरत होते. त्यानंतर याच विद्यापीठाअंतर्गत लातूर येथील कृषी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांनी १९९० ते १९९४ अशी सेवा बजावली. त्यानंतर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून निवड होऊन ते कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात नियुक्त झाले. तेथेच २००५ साली सेवानिवृत्त झाले. यंदा ते अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण करीत आहेत.
वडिलांच्या या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. निखिल गायकवाड यांनी ७ लाख ५० हजार रुपयांचा कृतज्ञता निधी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला दोन सुवर्णपदकांच्या निर्मितीसाठी प्रदान केला. नुकताच त्यांनी हा निधी आई-वडील व कुटुंबियांसह परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी वडिलांच्या तत्कालीन सहकारी प्राध्यापकांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. या हृद्य सोहळ्याने सर्वच उपस्थित भारावून गेले. यावेळी कुलसचिव धीरज कदम, डॉ. पी.एस. बोरीकर, डॉ. डी.डब्ल्यू. वडनेरकर, डॉ. डी.आर. मुंडे, डॉ. एम.बी. भोसले आदी उपस्थित होते.