no images were found
चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित, चुकीच्या; भारतीयांनी काळजी करू नये :डॉ. अचल श्रीखंडे
शांघाय : चीनमध्ये असलेला व्हेरियंट हा ओमिक्रॉन असून त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरियंटमधून भारतीय नागरिक गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबद्दल चिंता करण्याचं कारण नाही अशी माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी दिली. कोविडमुळे चीनमध्ये मृत्यूचं थैमान सुरू आहे अशा आशयाच्या बातम्या चुकीच्या आहेत. भारतीयांनीही त्याची काळजी करण्याची गरज नाही असे डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले.
चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असल्याच्या जगभरातल्या माध्यमांतील बातम्यांमुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा आपण दोन वर्षापूर्वीच्या स्थितीकडे परत जातोय की काय अशीही चर्चा होताना दिसतेय. पण चीनमधील जे काही चित्र आपल्यासमोर उभं केलं जात आहे ते वास्तविक नाही, चीनमध्ये तशी काहीच गंभीर आणि काळजीची परिस्थिती नाही असं डॉ. अचल श्रीखंडे यांनी एबीपी माझाला सांगितलं. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. डॉ. अचल श्रीखंडे हे सध्या चीनमधील शांघाय येथे आहेत. कोविड हा आपल्यासोबत राहणारच आहे, तो पूर्णता नष्ट होणार नाही. कोविड आता संसर्गजन्य रोग बनला असून तो सगळ्यांनाच होईल. सध्या चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पण त्याची काही काळजी करण्यासारखं नाही असं डॉ. अचल श्रीखंडे यांनी म्हटंलं.
डॉ. अचल श्रीखंडे चीनमधील वास्तविक परिस्थितीची माहिती देताना म्हणाले की, “चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हे खरं आहे. परंतु त्यामुळे चिंताजनक स्थिती कुठेही नाही. आम्ही डॉक्टर खुश आहोत. आम्हाला किमान कोरोनाचे रुग्ण तपासता येत आहे. लोक खूष आहेत. त्यांना सततची सक्ती होती ती दूर झाली आहे. जगभरात दाखवण्यात येतंय तशी काही परिस्थिती चीनमध्ये नाही. चीनमध्ये पसरणारा व्हेरियंट हा ओमिक्रॉन आहे. तो वेगाने पसरतो आहे, परंतु अतिशय माईल्ड आहे. तीन दिवसांच्या उपचारानंतर सर्व वयोगटातील लोक बरे होत आहेत. केवळ दोन गोळ्या आम्ही देत आहोत.”
शांघायचा विचार करायचं झालं तर बहुसंख्य रुग्ण हे असिमटॅमीक आहेत असं डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले. ते म्हणाले की, “चीनमध्ये भारतीय वंशाचे डॉक्टर किंवा मराठी बोलणारे मंडळीपैकी कुणीही भयंकर स्थिती असल्याचं मला सांगितलं नाही. मी ज्या अंतरराष्ट्रीय रुग्णालयांमध्ये काम करतो तिथेही अशी स्थिती नाही. रूग्णालयं रुग्णांनी भरली नाहीत. या ठिकाणी ॲाक्सिजनचीही कमतरता नाही. लोकांना व्हेंटिलेशनवर जाण्याची गरज पडत नाही. मृत्यूदर हा अत्यंत कमी असून तो केवळ ६० वर्षानंतरच्या काही रुग्णांमध्ये आढळतो.”