
no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा एज्युलाईन्स कन्सलटंटशी सामंजस्य करार
कोल्हापूर (प्रतिनिधी):-राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर आणि एज्युलाईन्स एज्युकेशन कन्सलटंट, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता आणि एज्युलाईन्स चे संचालक आनंद हांदूर यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण, संशोधन, देवाणघेवाण कार्यक्रम, आणि संयुक्त शैक्षणिक उपक्रमांची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
या करारातर्गत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना विविध देशांतील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, व्हिसा प्रक्रिया, निवास आणि पूर्व-प्रस्थान मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संयुक्त परिसंवाद, कार्यशाळा व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन, अल्पकालीन प्रशिक्षण, क्रेडिट ट्रान्सफर व दुहेरी पदवी योजनेसाठी रचना, आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी प्रवेश, व्हिसा व लॉजिस्टिक सहाय्य आदी उपलब्ध होणार आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले, “विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण आणि संशोधन संधी मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा करार तीन वर्षांसाठी असून दोन्ही संस्थांच्या सहमतीने नूतनीकरण करता येईल.
यावेळी एज्युलाईन्सच्या अमृता हांदूर, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे, इंटरनॅशनल सेलचे सदस्य प्रा. सनी मोहिते आणि प्रा. गौरी म्हेतर, यावेळी डॉ. बी. डी. जितकर, डॉ. टी. बी. मोहिते, इंद्रजीत जाधव, डॉ. राधिका ढणाल, डॉ. नवनीत सांगले, प्रा. वसंत हसरे, डॉ. संतोष भोपळे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.