
no images were found
राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह निमित्त आयोजीत आरोग्य तपासणी शिबिराचा ६६ जोडप्यांनी घेतला लाभ
कोल्हापूर (प्रतिनिधी):- राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह निमित्त महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट टयूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व्यंध्यत्व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापुरात प्रथमच हे शिबीर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात सकाळी 9 ते 1 या वेळेत घेण्यात आले. आज या शिबिराचा ६६ पात्र जोडप्यांनी लाभ घेतला. कोल्हापरू महानगरपालिका प्रशासक के.मंजुलक्ष्मी व सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट टयूब बेबी सेंटरचे संस्थापक डॉ.वर्षा पाटील यांच्या पुढाकाराने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाट्न उप-आयुक्त पंडित पाटील, सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे संस्थापक डॉ.वर्षा पाटील यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले.
या शिबीरात आलेल्या जोडप्यांची नोंदणी करुन घेऊन त्यांची रक्त, लघवी तपासणी करण्यात आली. तसेच व्यंध्यत्व संदर्भातील शंकाचे निरसन करुन सल्ला व समुपदेशन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत वैद्यकिय तपासणी व उपचार हे महापालिका रुग्णालयांमार्फत अल्प दरात देण्यात येणार आहे. हे शिबीर येथून पुढे दर गुरुवारी महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आय. व्ही. एफ. टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तर्फे सकाळी 9 ते 1 या वेळेत घेण्यात येणार आहे. यामध्ये मोफत बाह्यरुग्ण तपासणी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे होणार आहे. तरी सर्व इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, प्रशासकिय वैद्यकीय अधिकारी डॉ.संजना बागडी, डॉ.औन्धकर, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, सर्व नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर्स व सावित्रीबाई फुले रुग्णायलाकडील सर्व स्टाफ उपस्थित होते.