no images were found
कोल्हापूर जिल्ह्यात होणार एक हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया:
अभियानाचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, :- जिल्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यातील गरजू व वयोवृद्ध रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली*.
हे आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत एक हजार रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले. ते म्हणाले या अभियानात तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विविध आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
आजारपणामुळे आर्थिक व मानसिक ताण सहन करणाऱ्या कुटुंबांना दिलासा देणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश असून कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यभर अशाच स्वरूपाची आरोग्य शिबिरे राबविण्याचा मानस यांचे आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले.
अभियानात नोंदणीची प्रकिया सुरू झाली असून संबंधित तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणी व नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या रुग्णांची आवश्यक तपासणी करून त्यांच्यावर गरजेनुसार मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, मूत्ररोग तसेच सर्वसाधारण शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येतील. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, गडहिंग्लज व गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालये तसेच राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे शस्त्रक्रियांची व्यवस्था करण्यात आली असून या आरोग्य अभियानाचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.