
no images were found
‘कन्नड वेदिके’कडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक ; सीमावाद चिघळला
बेळगाव : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे.त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे. कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नारायण गौडा हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे.
महाराष्ट्र सरकारने सीमा समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई बेळगावला येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संवाद साधणार होते. मात्र समोर एक मंत्री बेळगावात येऊ नये यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून कन्नड संघटनांनी संपूर्ण बेळगाव शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यानी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव जिल्ह्यात बंदीचा आदेश बजावल्यानंतर देखील कन्नड संघटना जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कन्नड संघटनांनामुळे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणी कन्नड संघटना जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत असून हिरे बागेवाडी येथे महाराष्ट्र राज्यातील ट्रक व इतर वाहनांवर चढून धिंगाणा घालण्यात आला. तसेच लाल पिवळे झेंडे फडकून महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम कन्नड संघटनानी केले आहे. या प्रकारामुळे मराठी भाषिकातून एकच संताप व्यक्त केला जात आहे तसेच कन्नड संघटनाना वेळीच रोखावे अन्यथा मराठी भाषिक जशास तसे उत्तर देतील असा इशारा देण्यात आला आहे.
तसेच, सोलापूर जिल्ह्यातील १८ गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सगांव, मुंडेवाडी, कुमठे, केगांव बु., केगांव खुर्द, चिंचोली नजीक, सुलेरजवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ इत्यादी गावं हे कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. तर जत तालुक्यातल्या ४० गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा केला आहे.