no images were found
अदाणी एंटरप्रायझेसच्या पहिल्या सहामाहीतील ईबीआयटीडीए मध्ये ५६ टक्के वाढ; ११,९५८ कोटी रुपयांची विक्रमी नोंद
अहमदाबाद, : अदाणी समूहाची प्रमुख कंपनी अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडने (एईएल) ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक ११,९५८ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए नोंदवला असून, त्यात मागील वर्षाच्या तुलनेत ५६ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न ६२ टक्क्यांनी वाढून ७१,५६९ कोटी रुपये झाले, तर चालू व्यवसायातील करपूर्व नफा (पीबीटी) ४५ टक्क्यांनी वाढून ३,२९७ कोटी रुपये झाला. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ७४ टक्क्यांनी वाढून ३८,०२३ कोटी रुपये, ईबीआयटीडीए ६२ टक्क्यांनी वाढून ६,३१६ कोटी रुपये आणि करपूर्व नफा १४६ टक्क्यांनी वाढून २,००२ कोटी रुपये झाला.
कंपनीच्या कामगिरीबाबत अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी म्हणाले की, सध्याच्या काळात वेगाने होणाऱ्या बदलांमुळे महत्त्वाकांक्षेची व्याप्ती सातत्याने वाढवणे आवश्यक आहे. अदाणी एंटरप्रायझेसने विविध व्यवसायांमध्ये मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची क्षमता विकसित केली आहे. एकात्मिक ऊर्जा, विमानतळ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) परिसंस्थांमधील गुंतवणूक ही त्याची अलीकडील उदाहरणे आहेत. अत्यंत अस्थिर परिस्थितीतही देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदार कंपनीवर विश्वास दाखवत असून, भारताच्या विकासाला मिळणारी गती लक्षात घेता भविष्यातील संधींचा लाभ घेण्यासाठी कंपनी अधिक सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अदाणी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (एएनआयएल) सौर ऊर्जा व्यवसायात महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून, सप्टेंबर २०२६ मध्ये ४.३ गिगावॅट क्षमतेची टॉपकॉन सौर मॉड्यूल उत्पादन लाइन कार्यान्वित झाल्यानंतर एकूण मॉड्यूल उत्पादन क्षमता १० गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. अतिरिक्त ६ गिगावॅट क्षमतेच्या सोलर सेल उत्पादन लाइनचे बांधकाम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे. पहिल्या सहामाहीत सौर मॉड्यूल विक्रीत १५ टक्के वाढ होऊन ती २,८१८ मेगावॅट झाली, तर पवन टर्बाइन जनरेटरची विक्री ५७ टक्क्यांनी वाढून ९९ संचांवर पोहोचली.
अदाणी कनेक्स या डेटा सेंटर व्यवसायाने नवी मुंबईतील डेटा सेंटरसाठी २४० मेगावॅट क्षमतेची नवीन हायपरस्केल ऑर्डर मिळवली आहे. यामुळे कंपनीची एकूण करारबद्ध क्षमता १.२ गिगावॅटपेक्षा अधिक झाली आहे. तिमाहीदरम्यान कार्यान्वित डेटा सेंटर क्षमता ९४.६ मेगावॅटपर्यंत वाढली. तसेच, नोएडा येथे १० मेगावॅट आणि पुणे येथे १९.२ मेगावॅट क्षमता ग्राहकांकडे सुपूर्द करण्यात आली. तांबे व्यवसायातही उत्पादन आणि विक्रीत वाढ नोंदवण्यात आली असून, पहिल्या सहामाहीतील विक्रीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ५.२ पट वाढून १,४५,३०० टन झाले. तांबे प्रकल्पाच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाल्यामुळे कंपनीच्या ईबीआयटीडीए आणि करपूर्व नफ्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले.
विमानतळ व्यवसायात दुसऱ्या तिमाहीत उत्पन्न २० टक्क्यांनी वाढून ३,७८६ कोटी रुपये झाले, तर ईबीआयटीडीए ५५ टक्क्यांनी वाढून १,६४१ कोटी रुपये नोंदवण्यात आला. पहिल्या सहामाहीत विमानतळ व्यवसायाचे उत्पन्न २८ टक्क्यांनी वाढून ७,५४९ कोटी रुपये आणि ईबीआयटीडीए ५२ टक्क्यांनी वाढून ३,२७५ कोटी रुपये झाला. दरम्यान,सीएआरई या पतमानांकन संस्थेने अदाणी एंटरप्रायझेसचे दीर्घकालीन पतमानांकन एए/स्टेबल असे वाढवले आहे. कंपनीच्या इतिहासातील हे सर्वोच्च पतमानांकन असून, व्यवसायातील वाढ, नव्याने कार्यान्वित झालेल्या उत्पादन क्षमता आणि विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीतून कंपनीच्या आर्थिक कामगिरीला बळ मिळत असल्याचे या निकालांमधून दिसून येते.