no images were found
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात ‘लक्ष्या’च्या आईची साकारलेली भूमिका मराठी मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात त्यांचं निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री आजाराशी झुंज देत होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 जुलै 1953 साली मधु कांबीकर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. तमाशाच्या फडातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. तमाशानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधू कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या सिनेमामधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या.